Hockey Team India (Photo Credit- X)
IND Beat KOR: भारतीय हॉकी संघाने हॉकी आशिया कप 2025 स्पर्धेत आपल्या दमदार कामगिरीचा प्रत्यय देत विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी दक्षिण कोरियाचा 4-1 असा एकतर्फी पराभव केला. या विजयामुळे भारतीय संघाने पुढील वर्षी होणाऱ्या हॉकी विश्वचषक 2026 साठी थेट पात्रता मिळवली आहे. संपूर्ण स्पर्धेत भारताने एकही सामना न गमावता हा किताब जिंकला.
अंतिम सामन्यात भारतीय संघाची सुरुवात वादळी झाली. सुखजीत सिंगने सामना सुरू झाल्यानंतर काही सेकंदांतच पहिला गोल डागून भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर, भारतीय खेळाडूंनी आक्रमक भूमिका स्वीकारत कोरियाच्या बचाव फळीवर सतत दबाव ठेवला.
𝗖𝗵𝗮𝗺𝗽𝗶𝗼𝗻𝘀 𝗼𝗳 𝗔𝘀𝗶𝗮! 🏆🇮🇳🔥
India reign supreme at the Hero Asia Cup Rajgir, Bihar 2025 with a stellar campaign to lift the crown — their fourth Asia Cup title. 👑#HockeyIndia #IndiaKaGame #HumseHaiHockey #HeroAsiaCupRajgir pic.twitter.com/AOfD8wbB2K
— Hockey India (@TheHockeyIndia) September 7, 2025
दुसऱ्या क्वार्टरमध्ये, दिलप्रीत सिंगने 27 व्या मिनिटाला दुसरा गोल करून भारताची आघाडी दुप्पट केली, ज्यामुळे संघाचा आत्मविश्वास वाढला. तिसऱ्या क्वार्टरमध्येही भारताची आक्रमक खेळी सुरूच राहिली. दिलप्रीतने आपला दुसरा आणि संघासाठी तिसरा गोल डागून विजयाचा मार्ग सुकर केला.
चौथ्या क्वार्टरमध्ये अमित रोहिदासने 49 व्या मिनिटाला भारतासाठी चौथा गोल केला आणि भारताची आघाडी 4-0 अशी वाढवली. त्यानंतर कोरियाच्या खेळाडूने त्यांच्यासाठी एकमेव गोल केला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अखेर भारताने हा सामना 4-1 ने जिंकत चौथे आशिया कप विजेतेपद आपल्या नावे केले.
यापूर्वी भारताने 2003, 2007 आणि 2017 मध्ये ही ट्रॉफी जिंकली होती. आता 4 विजेतेपदांसह भारताने पाकिस्तानला (3 विजेतेपदे) मागे टाकले आहे. भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत दाखवलेली दमदार कामगिरी आणि एकही सामना न गमावता जिंकलेला हा किताब त्यांच्या उत्कृष्ट तयारीचा पुरावा आहे.