
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
कव्हरश्युअर या ग्राहकाभिमुख इन्शुरटेक प्लॅटफॉर्मने भारत सरकारची टपाल सेवा आणि जगातील सर्वात मोठे टपाल नेटवर्क चालवणाऱ्या इंडिया पोस्टसोबत सहयोग केला आहे, ज्याअंतर्गत भारतीय कुटुंबांमध्ये विमा सज्जता आणि क्लेम (दावे) तयारीला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. #ChitthiAayiHai उपक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेला हा सहयोग भारतातील सर्वात परिचयाच्या आणि विश्वासार्ह संवाद माध्यमांपैकी एक असलेल्या अंतर्देशीय पत्राला पुन्हा नवजीवन देत आहे. याद्वारे कुटुंबांना महत्त्वाची विमा माहिती नोंदवण्यासाठी, शेअर करण्यासाठी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल, ज्यामुळे आपत्कालीन किंवा क्लेमच्या परिस्थितीत ते अधिक चांगल्या प्रकारे सज्ज राहू शकतील.
हा उपक्रम इंडिया पोस्टद्वारे बारकोड-सक्षम अंतर्देशीय पत्रांच्या परिचयाचीही सुरुवात करतो. यामुळे पारंपारिक पत्रांचे साधेपण आणि आपुलकी कायम ठेवत पाठवणाऱ्यांना त्यांची पत्रे डिजिटली ट्रॅक करण्याची सुविधा मिळेल. हे बारकोड वैशिष्ट्य आगामी काळात सर्वच अंतर्देशीय पत्रांसाठी लागू केले जाणार आहे.
या उपक्रमाचा भाग म्हणून, पहिल्या टप्प्यात कव्हरश्युअर इंडिया पोस्टच्या वितरण नेटवर्कद्वारे १५ शहरांमध्ये १०,००० अंतर्देशीय पत्रांचा वापर करणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून पॉलिसीधारकांना त्यांच्या कुटुंबासह विम्यातील आवश्यक तपशील नोंदवण्यास आणि शेअर करण्यास प्रोत्साहित केले जाईल, ज्यामध्ये पॉलिसी क्रमांक, नॉमिनीची (वारसदार) माहिती, विम्याची मर्यादा, टीपीए संपर्क, क्लेम हेल्पलाइन आणि जवळचे कॅशलेस नेटवर्क हॉस्पिटल्स यांचा समावेश आहे.
विमा साक्षरता, लाभार्थी जागरूकता, क्लेम सज्जता आणि कौटुंबिक स्तरावरील विमा साक्षरतेबाबत व्यापक चर्चा घडवून आणण्यासाठी या संकल्पनेचा विस्तार विमा क्षेत्रातील दिग्गज आणि या परिसंस्थेतील भागधारकांपर्यंत केला जात आहे.कव्हरश्युअरच्या मते, देशात विम्याचा वापर वाढत असला तरी विमा सुविधेचा प्रभावी लाभ घेण्यामधील सर्वात मोठा अडथळा म्हणजे पॉलिसी असणे आणि लाभार्थी त्याबद्दल सज्ज असणे यातील तफावत हाच आहे. पॉलिसीधारक वर्षानुवर्षे अत्यंत प्रामाणिकपणे प्रीमियम भरत असतील, पण त्यांचे पती/पत्नी, मुले किंवा पालकांना अनेकदा पॉलिसीची कागदपत्रे कुठे ठेवली आहेत, कोणते फायदे उपलब्ध आहेत, कोणाशी संपर्क साधायचा किंवा क्लेमची प्रक्रिया कशी सुरू करायची, याची माहिती नसते. एखाद्या वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी किंवा जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर या माहितीच्या अभावामुळे विमा लाभ मिळण्यास उशीर होऊ शकतो किंवा कधी-कधी त्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते.
हा उपक्रम अशा वेळी समोर आला आहे जेव्हा लाभार्थ्यांची सज्जता सुधारण्याकडे संपूर्ण विमा क्षेत्राचे लक्ष वेधले जात आहे. आयआरडीएआयच्या# आकडेवारीनुसार, २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत विमा कंपन्यांकडे ८,९७३.८९ कोटी रूपये क्लेम न केलेली विम्याची रक्कम पडून होती. ही आकडेवारी पॉलिसीची माहिती आणि क्लेमशी संबंधित तपशील लिहून ठेवण्याची व ते कुटुंबातील सदस्यांसोबत शेअर करण्याची गरज अधोरेखित करते. याचप्रमाणे, कव्हरश्युअरने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात निदर्शनास आले की, कुटुंबातील ६० टक्के अवलंबून असलेल्या व्यक्तींना आपल्याला कोणत्या विमा पॉलिसीचे संरक्षण लाभले आहे, याबाबत माहित नव्हते.
#ChitthiAayiHai हे पाऊल विम्याबाबत माहिती घरात अधिक ठळकपणे उपलब्ध आणि वापरण्यायोग्य बनवण्यासाठी उचलण्यात आले आहे. प्रत्येक अंतर्देशीय पत्रात कव्हरश्युअरचा एक संदेश आहे आणि पॉलिसीधारकांसाठी मार्गदर्शक जागा दिली आहे, ज्यामुळे ते आपल्या कुटुंबाला संरक्षणाबद्दल आश्वस्त करू शकतील. हा उपक्रम अंतर्देशीय पत्राचे रूपांतर एका व्यावहारिक आणि उपयुक्त साधनामध्ये करतो, ज्यामुळे विम्याची महत्त्वाची माहिती विखुरलेली कागदपत्रे, ईमेल्स आणि अॅप्समधून बाहेर काढून अशा स्वरूपात आणली जाईल, जी कुटुंबातील सदस्यांना सहज सापडेल आणि समजेल.
हा उपक्रम कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी अंतर्देशीय पत्राच्या भावनिक ओळखीचाही वापर करतो. पिढ्यानपिढ्या, अंतर्देशीय पत्रांनी वैयक्तिक बातम्या, कौटुंबिक रहस्ये आणि आजही महत्त्वाच्या असलेल्या आठवणी पुढे नेल्या आहेत. १२५ हून अधिक कुटुंबांशी संवाद साधताना कव्हरश्युअरला दिसून आले की, बहुतेकांनी आपली अंतर्देशीय पत्रे ३० ते ५० वर्षांहून अधिक काळ जपून ठेवली आहेत आणि ती अजूनही अगदी चांगल्या स्थितीत आहेत! कव्हरश्युअर आता त्याच विश्वासार्ह स्वरूपाचा वापर एक वेगळा संदेश देण्यासाठी करत आहे: असा संदेश जो कुटुंबांना विमा, संरक्षण आणि पूर्वतयारीबद्दल मोकळेपणाने बोलण्यास प्रवृत्त करतो.
या उपक्रमाबद्दल मत व्यक्त करत कव्हरश्युअरचे संस्थापक आणि सीईओ सौरभ विजयवर्गीय म्हणाले, “विमा हा फक्त पॉलिसीच्या कागदपत्रांमध्ये किंवा डिजिटल फोल्डर्समध्ये बंदिस्त राहता कामा नये. ज्यांच्या संरक्षणासाठी तो घेतला आहे, त्यांना विमा अस्तित्वात आहे याची माहिती हवी, तो कुठे शोधायचा आणि कसा वापरायचा हे माहित हवे. #ChitthiAayiHai च्या माध्यमातून आम्हाला प्रत्येक पॉलिसीधारकाला प्रोत्साहित करायचे आहे की, त्यांनी आपल्या कुटुंबाशी हा संवाद आणीबाणीच्या वेळी नाही, तर त्याआधीच साधावा. हा फक्त एक वेळचा उपक्रम नसून, विश्वास आणि भारतीय नागरिकांचे हित लक्षात घेऊन इंडिया पोस्टसोबत केलेली ही एक दीर्घकालीन भागीदारी आहे.”
ते पुढे म्हणाले, “विम्याबद्दलची चर्चा अनेकदा फक्त पॉलिसी खरेदी आणि विम्याचा विस्तार यावरच केंद्रित असते. पण, खरेदी केलेल्या विम्याचा लाभ कुटुंबाला नक्की कसा मिळेल, हे त्यांना माहित असणे तितकेच महत्त्वाचे आहे. योग्य माहिती योग्य वेळी योग्य लोकांपर्यंत पोहोचते, तेव्हाच पॉलिसी खऱ्या अर्थाने मौल्यवान ठरते. ही माहिती शेअर करणे, ती शोधणे आणि त्यावर कृती करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी हा आमचा प्रयत्न आहे.”
या सहयोगाबाबत मत व्यक्त करत इंडिया पोस्टच्या महाराष्ट्र परिमंडळाचे चीफ पोस्टमास्टर जनरल श्री. अमिताभ सिंग म्हणाले, “इंडिया पोस्टने नेहमीच व्यक्ती, कुटुंबं आणि समुदायांना जोडणारा एक विश्वासार्ह दुवा म्हणून काम केले आहे. कव्हरश्युअरसोबत या सहयोगाच्या माध्यमातून आम्ही फक्त एक पत्रच नव्हे, तर आर्थिक साक्षरता आणि सज्जतेचा एक महत्त्वाचा संदेश पोहोचवणाऱ्या उपक्रमाला पाठबळ देत आहोत, याचा आम्हाला आनंद आहे. विविध शहरांमध्ये १०,००० अंतर्देशीय पत्रांचे प्रत्यक्ष वितरण करणे, हे सार्वजनिक जागरूकता आणि विश्वास निर्माण करण्यामध्ये प्रत्यक्ष संवादाच्या महत्त्वाच्या भूमिकेची आठवण करून देणारे आहे. हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवल्याचा आणि या महत्त्वपूर्ण टप्प्याची आमच्या दप्तरी अधिकृत नोंद झाल्याचा आम्हाला अभिमान आहे.”
कव्हरश्युअर हे विमा साक्षरता, तंत्रज्ञान आणि निर्णय सहाय्य यांच्या संयोजनावर कार्य करते. त्यांचा एआय-आधारित प्लॅटफॉर्म व्यक्तींना स्मार्ट विमा पोर्टफोलिओ तयार करण्यास, पॉलिसीचे फायदे आणि कव्हरमधील त्रुटी समजून घेण्यास, तसेच आरोग्य, जीवन, वाहन आणि प्रवास विम्याचे स्वस्त पर्याय शोधण्यास मदत करतो. #ChitthiAayiHai उपक्रमाद्वारे, कंपनी हीच मोहीम ऑफलाइन स्वरूपात प्रत्यक्ष कुटुंबांपर्यंत पोहोचवत आहे आणि भारत सरकारच्या २०४७ पर्यंत सर्वांसाठी विमा या मोहिमेला पाठबळ देत आहे. थोडक्यात सांगायचे तर,#ChitthiAayiHai हे कव्हरश्युअरच्या त्या विश्वासाला अधिक दृढ करते की, विम्याचे पूर्ण मूल्य तेव्हाच मिळते जेव्हा ज्यांच्या संरक्षणासाठी तो घेतला आहे, त्यांना संकटाच्या वेळी त्याचा लाभ कसा घ्यावा हे माहित असते.
Share Market Crash : शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex 304 अंशांनी कोसळला, IT शेअर्सना मोठा फटका