गुगल विकत घेणार 'ही' स्टार्टअप कंपनी; ...अब्जो डॉलरच्या खरेदी कराराची जगभर चर्चा!
काहीही शोधायचे असेल तर आपण सर्वप्रथम गुगलचा आधार घेतो. सर्व माहिती पुरवणारे, कुठल्याही प्रश्नाचे चुटकीसरशी उत्तर मिळवून देणारे एकमेव स्थान म्हणून गुगलची ओळख आहे. याच गुगलची (Google) पालक कंपनी ‘अल्फाबेट’ (Alphabet) ही एका स्टार्टअप कंपनीची खरेदी करणार आहे. विशेष म्हणजे हा दोन्ही कंपन्यांमध्ये हा करार झाल्यास, गुगलने आतापर्यंत केलेला हा सर्वांत मोठा खरेदी करार ठरणार आहे.
काय आहे ‘या’ कंपनीचे नाव?
गुगलची अल्फाबेट (Alphabet) ही कंपनी सायबर सुरक्षा क्षेत्रातील विज (Wiz) या स्टार्टअप कंपनीची खरेदी करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा खरेदी करार तब्बल 23 अब्ज डॉलर्सला होणार आहे. रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने या कराराबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे. या वृत्तानुसार अल्फाबेट कंपनीकडून 23 अब्ज डॉलर्समध्ये विज (Wiz) ही कंपनी करेदी केली जात आहे. त्यासाठीचा हा करार अंतिम टप्प्यात असून, हा खरेदी करार पूर्ण झाल्यावर त्याविषयीची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता दोन्ही कंपन्यांमधील हा खरेदी करार पूर्ण झाल्यास गुगलने आतापर्यंत केलेला हा सर्वांत मोठा खरेदी करार ठरणार आहे.
काय आहे विज कंपनी?
आता अनेकांना प्रश्न पडला असेल की, थेट गुगलकडून विज (Wiz) कंपनीला खरेदीची ऑफर आली आहे. ज्यामुळे प्रकाशझोतात आलेली ही कंपनी नेमके काय काम करते? तर विज ही एक सायबर सुरक्षा क्षेत्रात काम करणारी एक स्टार्टअप कंपनी आहे. या कंपनीची सुरुवात इस्रायलमध्ये झाली आहे. या कंपनीचे मुख्यालय न्यूयॉर्क असून, ही कंपनी ग्राहकांना क्लाऊड बेस्ड सायबर सुरक्षा देते.
माइक्रोसॉफ्ट, अमेझॉनसोबतही करार
गेल्या काही वर्षांत या कंपनीने चांगली प्रगती केली असून, मॉर्गन स्टेनली, डॉक्यूसाईन आदी दिग्गज कंपन्या वीज या कंपनीच्या ग्राहक आहेत. माइक्रोसॉफ्ट (Microsoft) आणि अमेझॉन (Amazon) अशा दिग्गज क्लाऊड सेवा प्रोव्हायडर कंपन्यासोबतही या कंपनीची भागिदारी आहे. इतकेच नाही तर कंपनीचा अमेरिका, युरोप, आशिया या खंडांमध्ये विस्तार झालेला आहे. इस्रायलमध्ये या कंपनीचे 900 कर्मचारी आहेत. तर यावर्षी कंपनीकडून आणखी 400 कर्मचाऱ्यांना नोकरीवर घेण्याच्या विचारात आहे. सायबर धोक्यांना ओळखण्यासाठी या कंपनीकडून आर्टिफिशीयल इंटेलिजन्सचा वापर केला जातो.
याआधी गुगलने खरेदी केलीये ‘ही’ कंपनी
गुगल आणि विज (Wiz) या कंपन्यांमध्ये हा करार झाल्यास तो ऐतिहासिक ठरणार आहे. यापूर्वी गुगलने कोणत्याही कंपनीसोबत इतका मोठा करार केला नसून, गुगलचा हा आतापर्यंतचा हा सर्वाधिक मोठा करार आहे. याआधी गुगलने 2012 साली मोटोरोलो मोबिलिटी या कंपनीसोबत खरेदी करार केला होता. या करारासाठी गुगलकडून 12.5 अब्ज डॉलर खर्च करण्यात आले होते. मात्र, या कराराच्या माध्यमातून गुगलला तोटा झाला होता. कारण खरेदीच्या काही कालावधीनंतर गुगलने मोटोरोला मोबिलिटी ही कंपनी केवळ 2.91 अब्ज डॉलर इतक्या तुटपुंज्या किमतीत विकली होती.