
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) पर्यवेक्षण विभागाच्या मुख्य महाव्यवस्थापक (प्रभारी) श्रीमती मोनीषा चक्रवर्ती (Monisha Chakraborty) यांच्या हस्ते आयआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या संस्थेचे उद्घाटन करण्यात आले. पायाभूत सुविधा क्षेत्रातील कर्ज पुरवठ्याशी संबंधित समस्या सोडवणे, ही ‘आयआयडी’च्या स्थापनेमागील प्रमुख संकल्पना आहे. ही संस्था पायाभूत सुविधा क्षेत्रातील भागधारकांना विशेष ज्ञान देणे, त्यांची तांत्रिक क्षमता वाढवणे आणि प्रमाणित सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्यासाठी एका पद्धतशीर संस्थात्मक यंत्रणेच्या महत्त्वपूर्ण गरजेवर भर देते. मुंबईत ‘आयआयडी’च्या स्थापनेचे नेतृत्व ‘नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट’चे सीएचआरओ श्री. संजीव वैद्य (Sanjev Vaid) यांनी केले आहे.
संस्थेने प्रकल्प आणि पायाभूत सुविधा वित्तपुरवठा या विषयावरील पहिला कार्यक्रम सुरू करण्यासाठी ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट’ (NIBM) सोबत भागीदारी केली आहे. आठवडाभर चालणाऱ्या या कार्यक्रमात संस्थेचे मूल्यमापन, आर्थिक व्यवहार्यता, पर्यावरणीय बाबी, क्षेत्र-विशिष्ट आर्थिक मूल्यमापन आणि कर्ज वितरणांनंतरचे संनियंत्रण/देखरेख यासारख्या इतर महत्त्वाच्या बाबींचा समावेश राहणार आहे. या उद्घाटनपर कार्यक्रमात विविध बँका आणि पायाभूत सुविधा वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांमधील ४७ तज्ज्ञांनी सहभाग घेतला. भविष्यात, ही संस्था राज्य प्राधिकरणे आणि नागरी स्थानिक संस्थांच्या संस्थात्मक क्षमता बळकट करण्यासाठी विशेष अभ्यासक्रम सुरू करणार आहे. प्रकल्पाचा अहवाल तयार करणे, आर्थिक संरचना, नियमांचे पालन आणि गुंतवणूकदारांशी समन्वय साधणे या विषयांवर हा अभ्यासक्रम आधारित राहणार आहे.
नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंटचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजकिरण राय जी. म्हणाले, “इन्स्टिट्यूट फॉर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची सुरुवात हा भारताच्या पायाभूत सुविधा वित्तपुरवठा परिसंस्थेला बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आहे. ज्ञान आणि कौशल्य विकासासाठी पद्धतशीर व्यासपीठाची उभारणी करत पायाभूत सुविधांचा शाश्वत आणि कार्यक्षम विकास घडवून आणण्यासाठी भागधारकांना सक्षम बनवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. संस्थेच्या या उद्घाटनपर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट (एनआयबीएम) ने केलेल्या अमूल्य प्रयत्नांबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. इन्स्टिट्यूट फॉर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटला एक उत्कृष्ट केंद्र (सेंटर ऑफ एक्सेलेन्स) म्हणून स्थापित करणे, हे आमचे ध्येय आहे आणि ते पायाभूत सुविधा क्षेत्रात क्षमता निर्मिती करेल, कार्यक्षमता वाढवेल आणि वैचारिक नेतृत्वाला नक्कीच प्रोत्साहन देईल.”
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पर्यवेक्षण विभागाच्या मुख्य महाव्यवस्थापक (प्रभारी) श्रीमती मोनीषा चक्रवर्ती म्हणाल्या, “पायाभूत सुविधांचा वित्तपुरवठा हा भारताच्या विकासाचा पाया आहे आणि या संस्थेची सुरुवात एका अत्यंत महत्त्वपूर्ण क्षणी झाली आहे. वित्तीय संस्था, शैक्षणिक क्षेत्र आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ एकाच ठिकाणी आणून, ही संस्था शिक्षण, ज्ञान सामायिकरण आणि सहकार्यासाठी एक सर्वसमावेशक व्यासपीठ तयार करेल. या संस्थेच्या माध्यमातून सर्वोत्तम पद्धतींना अधिक बळ मिळेल, तांत्रिक क्षमतांमध्ये सातत्याने सुधारणा होईल आणि पायाभूत सुविधा वित्तपुरवठ्याचे अर्थजगत आणखी सक्षम होईल.”
Tata Group History : इंग्रजांच्या टोमण्याला ‘ताज’चे उत्तर; टाटा घराण्याने अमेरिकेलाही दाखवली ताकद