
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
कंपनीने सांगितले की, या समझोत्यामध्ये अंदाजे ७६,००० दाव्यांचा समावेश आहे. यामध्ये न्यू जर्सीमधील फेडरल कोर्टात एकाच वेळी सुनावणी सुरू असलेल्या प्रकरणांचा आणि विविध राज्य न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या संबंधित खटल्यांचा समावेश आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, हा समझोता तिच्याविरुद्ध असलेल्या टॅल्क-संबंधित जवळपास सर्व उर्वरित दाव्यांचे प्रतिनिधित्व करतो.
जॉन्सन अँड जॉन्सनवर त्यांच्या टॅल्क पावडरमध्ये एस्बेस्टॉस असल्याचा आरोप होता, ज्यामुळे मेसोथेलिओमा आणि गर्भाशयाच्या कर्करोगासारखे गंभीर आजार होत होते. जवळपास २० वर्षांनंतर, वकिलांनी तडजोड केली आहे. कंपनीचे उपाध्यक्ष एरिक हास यांनी सांगितले की, हे आरोप निराधार आहेत, परंतु कंपनी हा दीर्घकाळ चाललेला वाद मिटवण्यासाठी तडजोड करत आहे.
जॉन्सन अँड जॉन्सन २०२७ मध्ये ३ अब्ज डॉलर्स म्हणजेच २८,६८० कोटी रुपये आणि उर्वरित रक्कम २०२८ मध्ये दिली जाईल. पण, जर अधिक लोक या तडजोडीत सामील झाले, तर एकूण देय रक्कम ७ अब्ज डॉलर्स म्हणजेच ६६,९२० कोटी रुपये किंवा त्याहूनही अधिक होऊ शकते. या तडजोडीमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाशी संबंधित पात्र दाव्यांचा समावेश असेल, परंतु कंपनीच्या एकूण देय रकमेवर कोणतीही मर्यादा नसल्याचं समोर येत आहे.
जॉन्सन अँड जॉन्सनचा दावा आहे की त्यांची टॅल्क उत्पादने सुरक्षित आहेत आणि त्यात एस्बेस्टॉस नाही. कंपनीने २०२० मध्ये अमेरिकेत टॅल्कयुक्त बेबी पावडरची विक्री बंद केली, परंतु दिवाळखोरीच्या प्रक्रियेद्वारे हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर २०२५ मध्ये हा कायदेशीर वाद पुन्हा सुरू झाला.