
दूध दरवाढीचा सर्वसामान्यांच्या खिशाला फटका; गाई-म्हशीचं दूध 'इतक्या' रुपयांनी महागलं; 11 ऑगस्टपासून नवे दर लागू
Milk Price Hike News in Marathi : सर्वसामान्यसाठी महत्त्वाची बातमी असून डिझेल, साखर, पॅकिंग साहित्य तसेच दूध खरेदीच्या दरात झालेल्या वाढीमुळे दूध व्यवसायाचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या वाढत्या खर्चाचा ताळमेळ साधण्यासाठी दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने दूध विक्रीच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ मंगळवार, ११ ऑगस्ट २०२६ पासून लागू होणार आहे. याशिवाय विविध दुग्धजन्य पदार्थांच्या विक्री दरातही १० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात येणार आहे.
| प्रकार | सध्याचा दर | ११ ऑगस्टपासून नवा दर |
|---|---|---|
| गायीचे दूध | ६० प्रतिलिटर | ६२ प्रतिलिटर |
| म्हशीचे दूध | ७६ प्रतिलिटर | ७८ प्रतिलिटर |
यामुळे दररोज दूध खरेदी करणाऱ्या कुटुंबांच्या मासिक खर्चातही वाढ होणार आहे. त्यातच दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीत १० टक्क्यांपर्यंत वाढ होणार असल्याने दूध, दही, ताक, पनीर, तूप यांसह इतर उत्पादनांच्या खरेदीसाठी ग्राहकांना अधिक खर्च करावा लागू शकतो.
दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही काळात दूध व्यवसायाशी संबंधित जवळपास सर्वच खर्च वाढले आहेत.
डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे १० रुपयांची वाढ झाली आहे.
साखरेचे दर प्रतिकिलो सुमारे १२ रुपयांनी वाढले आहेत.
पॅकिंग साहित्याच्या खर्चात ३० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
दूध खरेदीचे दरही वाढले आहेत.
वाहतूक, प्रक्रिया आणि इतर व्यावसायिक खर्च वाढल्याने एकूण उत्पादन खर्चावर मोठा परिणाम झाला आहे.
या सर्व वाढीचा थेट परिणाम दूध उत्पादक आणि दूध प्रक्रिया करणाऱ्या संस्थांच्या आर्थिक गणितावर झाला आहे. त्यामुळे वाढत्या खर्चाच्या तुलनेत दूध विक्रीतून मिळणारे उत्पन्न अपुरे पडत असल्याचे संघाकडून सांगण्यात आले.
राज्यातील सहकारी आणि खासगी डेअऱ्यांची शिखर संस्था असलेल्या दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या सभासदांची बैठक पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित अर्थात कात्रज डेअरी येथे झाली.
संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. बैठकीत दूध उत्पादन, प्रक्रिया, पॅकिंग आणि वाहतूक यासाठी होणाऱ्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. वाढत्या खर्चामुळे दूध उत्पादकांवर येणारा आर्थिक ताण लक्षात घेऊन दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या दरवाढीचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीला राज्यातील प्रमुख सहकारी आणि खासगी दूध संघांचे सुमारे २० प्रतिनिधी उपस्थित होते.
उत्पादन खर्च वाढत असताना दूध उत्पादकांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळणे आवश्यक असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. त्यामुळे दूध विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
संघाच्या मते, उत्पादन, पॅकिंग, वाहतूक आणि प्रक्रिया खर्चात झालेली वाढ लक्षात घेता दरवाढ करणे आवश्यक झाले आहे. या निर्णयामुळे वाढत्या खर्चाचा काही प्रमाणात समतोल साधण्यास मदत होईल आणि दूध उत्पादकांना योग्य मोबदला मिळण्यास हातभार लागेल.
फक्त दुधाच्या दरातच वाढ होणार नाही, तर विविध दुग्धजन्य पदार्थांच्या विक्री दरातही १० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दूध प्रक्रिया उद्योगातील वाढत्या खर्चाचा परिणाम थेट ग्राहकांवरही जाणवणार आहे.
विशेषतः दूधावर आधारित पदार्थांची किंमत वाढल्यास घरगुती बजेटसोबतच हॉटेल, मिठाई दुकाने, बेकरी आणि खाद्यपदार्थ व्यवसायांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
बैठकीदरम्यान पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अरुण सिताराम चांभारे यांचा दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
तसेच अॅनालॉग पनीरवरील बंदीच्या प्रक्रियेत महत्त्वाचे सहकार्य केल्याबद्दल आमदार विक्रम पाचपुते यांचे आभार मानण्यात आले.
गायीचे दूध — ₹६० वरून ₹६२
म्हशीचे दूध — ₹७६ वरून ₹७८
दुग्धजन्य पदार्थ — १०% पर्यंत महागणार
म्हणजेच वाढत्या उत्पादन खर्चाचा भार कमी करण्यासाठी दूध उत्पादकांनी दरवाढीचा निर्णय घेतला असला, तरी त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर होणार आहे.
एफआरपीची चुकीची आकडेवारी देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करा; साखर आयुक्तांकडे मागणी