आज मोदी सरकार खरिप पिकांचे हमीभाव जाहीर करणार
देशातील काही भागांमध्ये मॉन्सूनने दमदार सुरुवात केली आहे. अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांची खरीप हंगामाच्या पेरणीसाठी लगबग सुरु आहे. अशातच आता आज (ता.१९) संध्याकाळच्या सुमारास केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील किमान आधारभूत किमतींची (हमीभाव) घोषणा करू शकतात. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या या बैठकीत १२ पिकांच्या हमीभावाची घोषणा होण्याची शक्यता होणार असल्याचे सांगितले जात आहे.
आज संध्याकाळी होणार बैठक
आज संध्याकाळी ६.३० वाजेच्या सुमारास कॅबिनेट मंत्रिमंडळाची विशेष बैठक पार पडणार आहे. या बैठकीत केंद्र सरकारकडून खरीप हंगामातील सर्व पिकांच्या हमीभावात (एमएसपी) वाढ केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. आज होणाऱ्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कृषिमूल्य आयोगाच्या १२ पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा प्रस्तावाला मंजुरी मिळणार आहे.
(फोटो सौजन्य : istock)
यंदा हमीभावाच्या घोषणेला विलंब
लोकसभा निवडणूक आणि नवीन सरकार स्थापनेत उशिरा झाला. परिणामी, यावर्षीच्या खरीप हंगामात पिकांच्या हमीभावात वाढ करण्याच्या निर्णयाला विलंब झाला आहे. मागील वर्षी केंद्र सरकारकडून खरीप हंगामातील पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय ७ जून रोजी घेण्यात आला होता. खरीप हंगामातील पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा प्रस्ताव केंद्रीय कृषिमूल्य आयोगाकडून केंद्र सरकारला सादर केला जातो. त्यानंतर सरकारकडून या प्रस्तावाला अंतिम मंजुरी दिली जाते. याबाबात केंद्रीय कृषिमूल्य आयोगाची यापूर्वीच बैठक झाली असल्याचे सांगितले जात आहे.
‘या’ पिकांच्या हमीभावात होणार वाढ
केंद्र सरकारकडून खरीप हंगामाच्या तोंडावर खरिपातील १२ पिकांच्या हमीभावात वाढ केली जाते. यामध्ये प्रामुख्याने केंद्र सरकारकडून धान, ज्वारी, बाजरी, रागी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, कापूस आणि तीळ या १२ पिकांच्या हमीभावात आज भरघोस वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे.
हरियाणा आणि पंजाबमधील शेतकरी हमीभावाच्या कायद्यासाठी लढा देत आहे. त्यांच्या भावनांवर मीठ चोळण्याचे काम केंद्र सरकारकडून केले जात असल्याचे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे. तर एकीकडे आज केंद्र सरकारकडून खरिपातील पिकांच्या हमीभावात वाढ केली जाणारा असली तरी सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकासाठी हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे.






