Shivaji Park Gymkhana देणार महिला क्रिकेटला नवी दिशा; १५ वर्षांवरील खेळाडूंसाठी निवड चाचणी, सौजन्य : सोशल मीडिया
महिला क्रिकेटमधील नवोदित आणि गुणवंत खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे. दादर येथील ऐतिहासिक शिवाजी पार्क जिमखाना (SPG) (Shivaji Park Gymkhana) तर्फे 15 वर्षांवरील महिलांसाठी विशेष क्रिकेट निवड चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ही निवड चाचणी 5 आणि 6 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 7.30 वाजता शिवाजी पार्क जिमखान्याच्या मैदानावर होणार आहे.
शिवाजी पार्क जिमखान्याने भारतीय क्रिकेटला अनेक दिग्गज पुरुष क्रिकेटपटू दिले आहेत. या गौरवशाली परंपरेला पुढे नेत महिला क्रिकेटला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून गुणवंत, होतकरू आणि प्रतिभावान महिला क्रिकेटपटूंचा शोध घेऊन त्यांना दर्जेदार प्रशिक्षण आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.
या निवड चाचणीतून निवड झालेल्या खेळाडूंना आगामी क्रिकेट हंगामासाठी शिष्यवृत्ती तसेच मोफत आणि दर्जेदार क्रिकेट प्रशिक्षण दिले जाणार आहे. हा प्रशिक्षण हंगाम 16 नोव्हेंबर 2026 पासून सुरू होणार आहे. त्यामुळे महिला क्रिकेटपटूंना आपले कौशल्य विकसित करण्यासाठी आणि स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुढे जाण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
निवड झालेल्या आणि नियमानुसार पात्र असलेल्या खेळाडूंना शिवाजी पार्क जिमखान्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. त्यांना ए डिव्हिजन क्रिकेट सामन्यांमध्ये खेळता येईल. तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) लागू असलेल्या पात्रता निकष आणि नियमांनुसार पात्र खेळाडूंना MCA च्या स्पर्धांमध्येही सहभागी होता येणार आहे.
या निवड चाचणीसाठी 15 वर्षांवरील महिला क्रिकेटपटू पात्र असतील. मात्र, सहभागी खेळाडूंनी मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA)च्या कार्यक्षेत्रात वास्तव्यास असणे आवश्यक आहे. निवड चाचणीसाठी येणाऱ्या खेळाडूंनी पांढरा क्रिकेट गणवेश परिधान करणे बंधनकारक आहे. तसेच वयाच्या पुराव्यासाठी जन्म दाखला किंवा आधार कार्डाची छायांकित प्रत सोबत आणावी लागणार आहे.
Badminton कोर्टवर चुरशीच्या लढती; मुलांमध्ये रायगड, तर मुलींमध्ये…; सेमीफायनलमध्ये कोणाचा प्रवेश?
महिला क्रिकेटमधील उदयोन्मुख प्रतिभा शोधणे, त्यांना योग्य प्रशिक्षण देणे आणि उच्चस्तरीय स्पर्धात्मक क्रिकेटसाठी तयार करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे शिवाजी पार्क जिमखान्याच्या वतीने सांगण्यात आले आहे.
निवड चाचणी : 15 वर्षांवरील महिला
5 आणि 6 नोव्हेंबर 2026
वेळ : सकाळी 7.30 वाजता
स्थळ : शिवाजी पार्क जिमखाना (SPG), दादर, मुंबई
पात्रता : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यक्षेत्रातील 15 वर्षांवरील महिला
– पांढरा क्रिकेट गणवेश अनिवार्य
– जन्म दाखला किंवा आधार कार्डाची छायांकित प्रत
– निवड चाचणीतून ए डिव्हिजन क्रिकेटसाठी खेळाडूंची निवड






