फोटो सौजन्य - Social Media
आपण सगळेच यूट्यूबवर काही ना काही शोधत असतो. माहिती, मनोरंजन किंवा शिकण्यासाठी. पण कधी कधी एक चुकलेली टायपिंगसुद्धा जीवनाचे रूप पालटू शकते. राजस्थानातील जयपूर जिल्ह्यातील किशनगड रेनवाल गावातील नरेंद्र सिंह गिरवा यांची गोष्ट हेच सिद्ध करते. नरेंद्र यांचा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. गावाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर आधारित असली तरी त्यांच्या कडे फारशी जमीन नव्हती. पदवी शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी स्टेशनरी दुकान सुरू केले आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू ठेवला.
सुरुवातीला सर्व काही सुरळीत चालले होते. मात्र आठ वर्षांनी मालकाने दुकान रिकामे करण्यास सांगितले आणि नव्या ठिकाणी ग्राहक अभावी मोठा आर्थिक तोटा झाला. या संकटात घर चालवण्याची जबाबदारी त्यांच्या पत्नीच्या शिवणकामावर आली. आणि तेव्हाच एका योगायोगाने नरेंद्र यांना यूट्यूबवर ‘पर्ल फार्मिंग’ म्हणजेच मोत्यांची शेतीची माहिती मिळाली. हे काहीतरी वेगळं होतं. नरेंद्र यांनी जोखीम पत्करून २०१५ मध्ये मोत्यांची शेती सुरू करण्याचा निर्णय घेतला.
सुरुवातीचा अनुभव काहीसा कटू ठरला. त्यांनी घेतलेल्या १०० शिंपल्यांपैकी फक्त ३५ वाचले आणि ५०,००० रुपयांचा तोटा सहन करावा लागला. पण अपयशाने खचून न जाता, त्यांनी जिद्द ठेवली. दुसऱ्या प्रयत्नात ५०० शिंपले घेतली, काळजीपूर्वक देखभाल केली आणि प्रत्येक शिंपल्यातून ४ सुंदर मोती तयार केले. आज नरेंद्र सिंह गिरवा प्रत्येक मोती २०० ते ४०० रुपयांना विकतात आणि लाखोंची कमाई करतात. इतकेच नव्हे तर, ते इतर शेतकऱ्यांनाही पर्ल फार्मिंगचे प्रशिक्षण देतात, त्यामुळे अनेकांची आयुष्ये बदलत आहेत.
त्यांची कहाणी हेच शिकवते की, संकटात संधी पाहणाऱ्यांचे भविष्य उज्वल असते. कधी कधी एक चुकीचा सर्चदेखील तुमच्या स्वप्नांचे दार उघडू शकतो. फक्त जिद्द आणि चिकाटी हवी!