फोटो सौजन्य: iStock
जसे आपल्याला आपली आवडती नोकरी लागल्यावर खूप आनंद होतो, त्यापेक्षा कैकपट दुःख तेव्हा होते जेव्हा आपण आपली नोकरी गमावतो. आजच्या काळात अशा अनेक बातम्या पाहायला मिळतात, जिथे कर्मचाऱ्यांना अचानक नोकरीवरून काढून टाकण्यात येते. यामुळे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करणाऱ्यांमध्ये नेहमीच एक भीतीचे वातावरण असते. आता Intel ही कंपनी देखील आपल्या कर्मचाऱ्यांच्या हातात नारळ देण्याच्या तयारीत आहे.
जगातील प्रसिद्ध चिप उत्पादक कंपनी Intel एका मोठ्या बदलाची तयारी करत आहे. या आठवड्यात इंटेल त्यांच्या कंपनीतील 20 टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा करू शकते. गेल्या महिन्यातच पदभार स्वीकारणारे कंपनीचे नवे सीईओ Lip-Bu Tan मॅनेजमेंट कमी करण्यासाठी आणि इंजिनिअरिंगवर लक्ष केंद्रित करण्यासाठी पावले उचलत आहेत.
एक अहवालानुसार, कंपनीचे हे पाऊल ब्यूरोक्रेसी कमी करण्याच्या आणि इंटेलची मुख्य ओळख, म्हणजेच टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन पुन्हा मजबूत करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. यापूर्वीही, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, इंटेलने सुमारे 15000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. 2024 च्या अखेरीस कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या 1,08,900 पर्यंत कमी झाली होती, तर 2023 मध्ये हीच संख्या 1,24,800 होती. परंतु, इंटेलने यावर कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
असे असूनही न्यू यॉर्क स्टॉक एक्सचेंज उघडण्यापूर्वी प्री-मार्केट ट्रेडिंगमध्ये इंटेलचे शेअर्स 3.5 टक्क्यांपर्यंत वाढले. परंतु, गेल्या 12 महिन्यांत कंपनीचे शेअर्स सुमारे 43 टक्क्यांनी घसरले आहेत.
इंटेलचा हा बदल म्हणजे कंपनीने कठीण काळातून बाहेर पडण्याचा प्रयत्न आहे. विशेषतः AI कंप्युटिंगच्या बाबतीत, Nvidia सारख्या कंपन्यांनी बाजी मारली आहे. सलग तीन वर्षांपासून विक्रीत घट आणि तोटा यामुळे इंटेल मोठ्या संकटात सापडले आहे.
पूर्वी कॅडन्स डिझाइन सिस्टम्सशी कार्यरत असलेले लिप-बू टॅन यांनी आता इंटेलला पुनरुज्जीवित करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यांची योजना कंपनीच्या अनावश्यक व्यवसाय युनिट्स विकण्याची आणि अधिक शक्तिशाली उत्पादनांवर लक्ष केंद्रित करण्याची आहे. या दिशेने, गेल्या आठवड्यात इंटेलने त्यांच्या प्रोग्रामेबल चिप युनिट Altera चा 51 टक्के हिस्सा Silver Lake Management ला विकण्याचा निर्णय घेतला आहे.
टॅन यांनी अलीकडेच म्हटले आहे की इंटेलला त्यांची इंजिनिअरिंग टॅलेंट परत आणावे लागेल, बॅलन्स शीट मजबूत करावे लागेल आणि ग्राहकांच्या गरजांनुसार उत्पादन बनवावे लागेल. इंटेल गुरुवारी त्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल सादर करेल. असे मानले जाते की टॅन त्यावेळी त्यांची स्ट्रॅटर्जी अधिक स्पष्टपणे सांगतील. तसेच कंपनीला पूर्वपदावर येण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात.