'या' नवरत्न कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी; मिळालंय 17 हजार कोटींहून अधिकचे काम!
नवरत्न कंपनी एनबीसीसी (इंडिया) लिमिटेडच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. एनबीसीसीचे शेअर्स शुक्रवारी (ता.९) 11 टक्क्यांहून अधिक वाढून 188.50 रुपयांवर पोहोचले. कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ एक मोठी ऑर्डर मिळाल्यामुळे झाली आहे. एनबीसीसीला 15 हजार कोटी रुपयांची मोठी ऑर्डर मिळाली आहे. कंपनीला श्रीनगर विकास प्राधिकरणाकडून हे काम मिळाले आहे. एनबीसीसीचे शेअर्स गुरुवारी 168.90 रुपयांवर बंद झाले होते. तर आज कंपनीचे शेअर्स मोठ्या तेजीत पाहायला मिळाले.
कंपनीच्या मार्केट कॅपच्या निम्मी मिळालीये ऑर्डर
एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड श्रीनगरच्या बेमिना येथील रख-ए-गुंड अक्शा येथे 406 एकरांवर पसरलेली सॅटेलाइट टाउनशिप विकसित करणार आहे. विशेष म्हणजे या ऑर्डरचा आकार एनबीसीसीच्या 33 हजार कोटी रुपयांच्या मार्केट कॅपच्या जवळपास निम्मा आहे. हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने 5 वर्षांत पूर्ण केला जाईल आणि त्यात निवासी भूखंड, व्हिला, अपार्टमेंट, व्यावसायिक कार्यालये, इनडोअर स्पोर्ट्स सेंटर आणि सर्व आधुनिक सुविधांसह 5 स्टार रिसॉर्ट्स असतील. या वर्षी जूनमध्ये बांधकाम कंपनीला ग्रिड कंट्रोलर ऑफ इंडिया लिमिटेडकडून 70 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली होती.
हेही वाचा : …आता पासपोर्टशिवाय करता येणार विमान प्रवास; लवकरच होणार ‘हा’ मोठा बदल!
वर्षभरात शेअर्समध्ये 130 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ
एनबीसीसी (इंडिया) लिमिटेडचे शेअर्स गेल्या एका वर्षात 280 टक्क्यांनी वाढले आहेत. कंपनीचे शेअर्स 9 ऑगस्ट 2023 रोजी 48.85 रुपयांवर होते. तर 9 ऑगस्ट 2024 रोजी 188.50 रुपयांवर पोहोचले आहेत. या वर्षी आतापर्यंत एनबीसीसी शेअर्समध्ये 130 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला 1 जानेवारी 2024 रोजी या नवरत्न कंपनीचे शेअर्स 81.79 रुपयांवर होते.
दीर्घकालीन गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार मालामाल
गेल्या 2 वर्षात या सरकारी बांधकाम कंपनीचे शेअर्स 435 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्च पातळी 198.25 रुपये आहे. तर 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 46.61 रुपये आहे. ज्यामुळे या कंपनीच्या शेअरमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.