
Zomato-Swiggy Platform Fee: Online Food Order महागणार; झोमॅटोच्या पावलावर पाऊल टाकत स्विगीचा मोठा निर्णय
Zomato-Swiggy Platform Fee: भारतातील फूड डिलिव्हरी क्षेत्रात स्पर्धा तीव्र होत असताना Swiggy ने आपल्या प्लॅटफॉर्म शुल्कात वाढ केली आहे. कंपनीने प्रति-ऑर्डर आकारले जाणारे शुल्क १४.९९ रुपयांवरून वाढवून १७.५८ रुपये (GST) सह केले आहे. याआधी काही दिवसांपूर्वीच Zomato नेही आपले प्लॅटफॉर्म शुल्क १२.५० रुपयांवरून १७.५८ रुपये इतके वाढवले होते.
प्लॅटफॉर्म शुल्क म्हणजे प्रत्येक फूड डिलिव्हरी ऑर्डरवर आकारले जाणारे एक निश्चित शुल्क, जे ऑर्डरच्या एकूण किंमतीवर अवलंबून नसते. त्यामुळे ग्राहक कितीही कमी किंवा जास्त किमतीचे अन्न मागवले, तरी हे शुल्क समानच राहते. गेल्या काही महिन्यांत या शुल्कात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, स्विगीने यापूर्वी ऑगस्ट २०२५ मध्येही हे शुल्क १२ रुपयांवरून १४ रुपयांपर्यंत वाढवले होते, ज्यामुळे ही वाढ टप्प्याटप्प्याने होत असल्याचे स्पष्ट होते.
या शुल्कवाढीमुळे ग्राहकांच्या बिलामध्ये छोट्या-छोट्या घटकांचा वाटा वाढत आहे. एका व्यवहारात ही रक्कम कमी वाटली तरी, नियमितपणे फूड डिलिव्हरी सेवा वापरणाऱ्या ग्राहकांसाठी हा खर्च लक्षणीय ठरू शकतो. त्यामुळे ग्राहकांमध्ये या वाढीबाबत नाराजीही व्यक्त होत आहे.
कंपन्यांच्या मते, प्लॅटफॉर्म शुल्क वाढवण्यामागे तांत्रिक खर्च, ॲपची देखभाल, वितरण व्यवस्थापन आणि एकूण परिचालन खर्च भागवण्याची गरज आहे. वाढत्या स्पर्धेमध्ये ग्राहकांना जलद सेवा, अधिक पर्याय आणि सवलती देण्यासाठी कंपन्यांना मोठी गुंतवणूक करावी लागते, असे त्यांचे म्हणणे आहे.
Donald Trump Iran Strike Pause: डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! इराणवरील हल्ले स्थगित
दरम्यान, या शुल्कवाढीची वेळही महत्त्वाची मानली जात आहे. कारण फूड डिलिव्हरी क्षेत्रात नवीन स्पर्धक उदयास येत आहेत. विशेषतः Rapido या राइड-हेलिंग स्टार्टअपने बंगळूरूमध्ये ‘ओनली’ नावाची नवीन फूड डिलिव्हरी सेवा सुरू केली आहे. त्यामुळे बाजारात स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे.
एकूणच, स्विगी आणि झोमॅटो या दोन्ही प्रमुख कंपन्यांनी प्लॅटफॉर्म शुल्क वाढवल्याने ग्राहकांच्या खर्चात वाढ होणार असून, येत्या काळात इतर कंपन्याही अशाच प्रकारचे निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.