
कचरा आणि वीज संकट दोन्हीवर उतारा!
मुंबई: मुंबई महापालिकेने शहरात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य आणि शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी २०२२ साली हाती घेतलेला देवनार क्षेपणभूमी वीजनिर्मिती प्रकल्प तब्बल चार वर्षांच्या कालावधीनंतर आता पूर्ण झाला आहे. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, येत्या मे २०२६ मध्ये हा प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित करण्याचा पालिकेचा मानस आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पाला आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या मिळाल्या असून, पुढील सात महिन्यांत हा प्रकल्प कार्यान्वित होऊन प्रत्यक्षात वीज निर्मिती सुरू होईल, अशी माहिती पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे.
मुंबई शहर तसेच पूर्व आणि पश्चिम उपनगरांत निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने देवनार डम्पिंग ग्राउंड येथे हा प्रकल्प उभारला आहे.
प्रकल्पाचे कंत्राट ‘मेसर्स चेन्नई एमएसडब्ल्यू प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीला देण्यात आले आहे. हा करार एकूण १८ वर्षे ४ महिन्यांच्या कालावधीचा असून, त्याची सुरुवात ४ जून २०२२ पासून झाली आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत १०२० कोटी रुपये इतकी असून, त्यात कोणतीही वाढ झालेली नसल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितले, “देवनार डम्पिंग ग्राऊंडवर ९ एकर जागेत हा ‘वेस्ट टू पॉवर प्लँट’ उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाला आहे आणि पुढील सात महिन्यांत त्याचा वापर सुरू केला जाईल. प्रकल्पासाठी आवश्यक असलेली पर्यावरण विभागाची परवानगी मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. मात्र, आता आठवडाभरापूर्वीच पर्यावरण विभागाने आम्हाला परवानगीचे पत्र पाठवले आहे.”
प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेच्या वितरणाबद्दल अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त किरण दिघावकर यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिले:
“सर्व परवानग्या मिळाल्यानंतर वीज वितरणाचा निर्णय घेतला जाईल. या प्रकल्पाजवळ अदानी समूहाचा कॉरिडॉर आहे. निर्माण झालेली वीज तिकडे देखील वळवली जाऊ शकते, आणि त्या बदल्यात त्यांच्याकडून मोबदला घेतला जाऊ शकतो. मात्र, याबाबत कोणताही ठराव झालेला नाही अथवा अदानी समूहाशी चर्चाही झालेली नाही. सर्व परवानग्या मिळाल्यानंतरच याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल.”