
पीएसबीबरोबरील या भागीदारीच्या माध्यमातून, श्रीराम फायनान्स लिमिटेड (एसएफएल) देशातील क्रीडा जगत आणि तळागाळातील प्रतिभेपर्यंत आपला विस्तार करत आहे, परंतु त्याचबरोबर आर्थिक सर्वसमावेशकता आणि समुदाय विकासाच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीसाठी असलेली आपली बांधिलकी आणखी सक्षम करत आहे. या भागीदारीचा एक भाग म्हणून, भारतातील ‘पदुकोण स्कूल ऑफ बॅडमिंटन’ची (पीएसबी) सध्याची सर्व आणि भविष्यात सुरु होणारी केंद्रे “श्रीराम फायनान्स प्रायोजित पदुकोण स्कूल ऑफ बॅडमिंटन” या नावाने चालवली जाणार आहेत. देशभरात सर्व वयोगटांतील आणि उच्च स्तरावर पोहचण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या खेळाडूंना तळागाळातील स्तरावर शास्त्रीय पध्दतीने बॅडमिंटन प्रशिक्षणाची सुविधा सहजरित्या उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
नामकरणाचा अधिकार : भारतातील पीएसबीची सध्याची आणि भविष्यातील सर्व केंद्रे इथून पुढे “श्रीराम फायनान्स प्रायोजित पदुकोण स्कूल ऑफ बॅडमिंटन” या अधिकृत नावाने चालवली जातील.
खेळाडूंच्या पोषाखाचे प्रायोजकत्व: पीएसबीच्या सर्व अकॅडमींमधील खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी यांना २,००० पेक्षा जास्त ब्रँडेड टी-शर्ट्स वितरित केले जातील.
स्पर्धांचे प्रायोजकत्व : श्रीराम फायनान्सच्या मुख्य प्रायोजकत्वाखाली १३ खुल्या स्पर्धा आयोजित केल्या जातील; तसेच दोन ‘ऑल इंडिया योनेक्स’ स्पर्धांसाठी ‘मुख्य सहयोगी’ प्रायोजक म्हणून सहकार्य दिले जाणार आहे.
Repo Rate : कर्ज महागणार का? RBI च्या पतधोरणाआधी ग्राहक आणि बाजारपेठेची धाकधूक
गेल्या चार दशकांहून अधिक काळ, श्रीराम फायनान्स भारतातील लघु उद्योजक, सामान्य कर्जदार आणि बँकिंग सेवेपासून वंचित असलेल्या घटकांचा एक विश्वासू वित्तीय भागीदार म्हणून नावारुपास आलेली आहे. पीएसबीसोबतची ही भागीदारी त्यांच्या याच मूळ विचारसरणीचा एक नैसर्गिक विस्तार आहे आणि तिचा उद्देश केवळ नफा-तोटा किंवा ताळेबंदाचा विचार न करता, मानवी क्षमतेच्या विस्तारासाठी गुंतवणूक करणे आणि समुदाय जिथे राहतो, काम करतो आणि खेळतो, तेथे थेट पोहोचणे हा आहे.
या प्रसंगी बोलताना श्रीराम फायनान्सचे कार्यकारी उपाध्यक्ष श्री. उमेश रेवणकर म्हणाले, “आम्ही ज्या समाजाची सेवा करतो, त्या समाजात महत्वपुर्ण आणि सकारात्मक प्रभाव निर्माण करण्याच्या विचारधारेवर श्रीराम फायनान्सने नेहमीच दृढ विश्वास ठेवलेला आहे. ‘पदुकोण स्कूल ऑफ बॅडमिंटन’ सोबतच्या युतीतून आमची तीच बांधिलकी प्रकट होते. या उपक्रमाच्या माध्यमातून, देशातील तरुण खेळाडू संपूर्ण समर्पण, शिस्त आणि आत्मविश्वासाने या खेळासाठी पूर्णपणे झोकून देण्यासाठी प्रोत्साहित व प्रेरित होतील, अशी आम्हाला आशा आहे. त्याचबरोबर भारतात तळागाळातील क्रीडा जगताला अधिक बळकट करण्यास आम्हाला मदत करायची आहे.”
पदुकोण स्कूल ऑफ बॅडमिंटन’ची सध्या भारतात १८ शहरांमध्ये ७५ केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून व्यावसायिक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जात आहेत. ही केंद्रे तरुण प्रतिभेला अधिकाधिक वाव देण्यासाठी आणि या खेळामध्ये तरुणांचा, व्यक्तींचा अधिकाधिक सहभाग वाढवण्यासाठी तयार करण्यात आलेली आहेत.
याप्रसंगी बोलताना ‘पदुकोण स्कूल ऑफ बॅडमिंटन’चे संस्थापक, मार्गदर्शक आणि संचालक पद्मश्री प्रकाश पदुकोण म्हणाले, “पदुकोण स्कूल ऑफ बॅडमिंटनचे मुख्य प्रायोजक म्हणून श्रीराम फायनान्सचे स्वागत करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. ही भागीदारी तळागाळातील गुणवान खेळाडूंना घडवण्याच्या आणि शिखर गाठण्याची महत्त्वाकांक्षी असलेल्या भारतातील खेळाडूंना दर्जेदार बॅडमिंटन प्रशिक्षणाची सुविधा सहज उपलब्ध करून देण्याच्या आमच्या सामायिक ध्येयावर आधारित आहे. श्रीराम फायनान्सच्या भक्कम पाठबळामुळे, आणखी विस्तार करण्याची त्याचबरोबर योग्य मार्गदर्शन व पायाभूत सुविधांच्या जोरावर तरुण खेळाडूंना या खेळाचा कसून सराव करण्यासाठी, प्रगतीचे शिखर गाठण्यासाठी आणि त्यात करिअर करण्यासाठी अधिक सक्षम व्यासपीठ निर्माण करण्यासाठी आम्ही अतिशय उत्सुक आहोत.”
पदुकोण स्कूल ऑफ बॅडमिंटनतर्फे व्यावसायिक पद्धतीने चालवली जाणारी केंद्र त्याचबरोबर या खेळाचा नुकताच प्रारंभ केलेले, मध्यम आणि उच्च-कामगिरी बजावणारे खेळाडू अशा विविध स्तरांवर विस्तारलेल्या सुनियोजित विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून संपूर्ण भारतात दर्जेदार बॅडमिंटन प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी समर्पित आहे. या अकॅडमीच्या प्रशिक्षण व्यवस्थेमध्ये तांत्रिक कौशल्ये, चपळता, शारीरिक तंदुरुस्ती आणि स्पर्धांची कठोर तयारी या सर्व घटकांचा समावेश आहे. त्याचबरोबर भारतातील बॅडमिंटन क्षेत्राचा पाया अधिक भक्कम करण्याच्या उद्देशाने एक विशेष ‘प्रशिक्षक प्रमाणपत्र कार्यक्रम’ देखील चालवला जातो.