
सणासुदीच्या काळात साखरेच्या दराचं काय? ( सौजन्य - सोशल मीडिया )
सणासुदीच्या काळात साखरेचे दर नियंत्रणात राहण्याची शक्यता आहे. या मागचं मोठं कारणं म्हणजे साखरेच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सणासुदीच्या काळात साखरेचा पुरवठा वाढवण्यासाठी, केंद्र सरकारने साखर कारखान्यांना ऑक्टोबरमध्ये उत्पादित झालेली साखर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांत विकण्याची परवानगी दिली आहे. ही विक्री दोन्ही महिन्यांच्या नियमित मासिक विक्री कोट्याव्यतिरिक्त असणार असल्याचं सांगितलं जात आहे. याचा अर्थ, बाजारात साखरेचा मोठा साठा उपलब्ध होईल, आणि त्याचा थेट परिणाम किमती नियंत्रित ठेवण्यावर होणार आहे.
अन्न मंत्रालय देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी दर १५ दिवसांनी साखरेचा कोटा निश्चित करते. ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यासाठी १.३ दशलक्ष टन आणि दुसऱ्या पंधरवड्यासाठी १.४ दशलक्ष टन कोटा मंजूर करण्यात आला होता. सरकारने परवानगी दिलेला साखरेचा पुरवठा या निश्चित कोट्याव्यतिरिक्त असणार आहे. मंत्रालयाने नोव्हेंबर महिन्यासाठी अजूनपर्यंत कोटा निश्चित केलेला नाही, परंतु सणासुदीच्या काळात पुरवठा वाढवण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन AISTA चे अध्यक्ष प्रफुल्ल विठ्ठलानी यांनी या निर्णयाचे स्वागत केले आणि सांगितले की, यामुळे सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारात साखरेचा पुरवठा वाढेल. त्यांनी नमूद केले की, अनेक साखर कारखान्यांमध्ये नियोजित वेळेच्या जवळपास एक महिना आधीच या आठवड्यात ऊस गाळप सुरू झाले आहे. या वाढलेल्या पुरवठ्यामुळे देशभरात साखरेची उपलब्धता सुधारेल आणि घाऊक व किरकोळ किमती नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल.
देशांतर्गत किरकोळ बाजारात साखरेचे भाव ७० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले होते. पण, सरकारने नंतर कोटा आणि साठा निश्चित करण्यासाठी अधिक कठोर नियम लागू केले. यामुळे किमती लवकरच नियंत्रणात आल्या. इतकंच नाही, तर देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढवण्यासाठी सरकारने ऊस गाळप हंगाम एक महिना आधीच सुरू केला. या सगळ्या नियोजनानंतर साखरेच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी नक्कीच सरकारला यश मिळेल एवढं निश्चित आहे.