
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
गेल्या महिन्यात 80 ते 100 रुपये किलोपर्यंत पोहोचलेला टोमॅटो सध्या बाजारात 20 किलो क्रेटला 100 ते 125 रुपयांचा दरच मिळत आहे. या दरात उत्पादनाचा खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. नाशिक जिल्ह्यात अनेक भागात शेतकऱ्यांनी मोठा खर्च करत टोमॅटोची लागवड केली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून मात्र या मेहनतीला काही फळ मिळत नाही. टोमॅटोचा दर लक्षणीय घसरत आहे. साध्या 20 किलोच्या टोमॅटोच्या क्रेटला अवघा 100 ते 125 रुपये म्हणजे 5 ते 6 रुपये किलोचा दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
काही दिवसांपूर्वी उष्णतेची तीव्रता आणि पावसाने घेतलेल्या दीर्घ विश्रांतीमुळे भाजीपाल्याची आवक घटली होती. त्यामुळे टोमॅटोसह भाज्यांचे दर वाढले होते. मात्र, सध्या शेततळ्यांमध्ये उपलब्ध पाण्याच्या जोरावर शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड केली आहे. कमी कालावधीत उत्पादन मिळत असल्याने शेतकरी पारंपरिक पिकांऐवजी भाजीपाला पिकांकडे वळले आहेत. परिणामी बाजारातील आवकेवर झाला असून दर खाली आले आहे.
शेतकऱ्यांना मोठा संकटाचा सामना करावा लागत आहे. पीकाला मिळत असलेला दर शेतकऱ्यांसाठी धक्का देणारा ठरत आहे. यातून लागवडीसाठी केलेला खर्च शिवाय तोडणीचा खर्च, गाडीचे भाडे वसूल होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्याच नुकसानाला सामोरं जावं लागत आहे.
यासगळ्या पलीकडे तयार झालेलं पीक बाजारात विकलं जात नाही हे वेगळं मोठं टेन्शन शेतकऱ्यांसमोर उभं ठाकलं आहे. पिकलेल्या टोमॅटो व्यापारी घेत नसल्याने तो उकिरड्यावर फेकून द्यायची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास अशा पद्धतीने हिरावून घेतला जात असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.