
Ujjwala Scheme India: सरकार म्हणते ‘साठा पुरेसा’, पण नागरिकांना त्रास; इंधन संकटामुळे नागरिक हैराण
Ujjwala Scheme: देशात इंधन टंचाई नसल्याचा सरकार कितीही दावा करत असले तरी राज्याच्या विविध भागात स्वयंपाकाच्या गॅस (एलपीजी) साठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. उज्ज्वला योजनेचा पुरता बोजवारा उडला असून गृहिणींवर रॉकेलवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. पेट्रोल आणि डिझेलसाठीही पेट्रोल पंपावर गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक पेट्रोल पंपावर वाहनचालकांना मर्यादित स्वरूपात पेट्रोल आणि डिझेल देण्यात येत आहे. काही पंपावर तर इंधन संपल्याचे बोर्ड झळकल्याचे दिसत आहेत.
पश्चिम आशियातील युद्धामुळे देशातील गॅस आणि पेट्रोलचे संकट सातत्याने अधिकच गडद होत आहे. केंद्र सरकारचा दावा आहे की, देशात पेट्रोल आणि गॅसचा पुरेसा साठा आहे. इंधन घेऊन जहाजे सातत्याने येत आहेत. काळजी करण्याचे काही कारण नाही. संकटासारखी परिस्थिती ही केवळ एक अफवा आहे. दुसरीकडे मात्र इंधन संकटावर मात करण्यासाठी सरकारने सर्व राज्यांना अतिरिक्त ४८,००० किलो लिटर रॉकेलचे वाटप केले आहे.
महाराष्ट्राला अंदाजे ३७,४४,००० लिटर रॉकेल मिळाले आहे. महाराष्ट्र सरकारने प्रत्येक शिधापत्रिका धारकाला ३ लिटर रॉकेल देण्याची व्यवस्था केली आहे. छगन भुजबळ यांनी सांगितले की, शिधावाटप दुकानांव्यतिरिक्त पेट्रोल पंपांमार्फतही रॉकेलचे वितरण केले जाईल. पुरेसा साठा असूनही गॅस आणि पेट्रोलचा तुटवडा का कायम आहे? असा प्रश्न विचारला जात आहे.
नायराचे पेट्रोल ५ तर डिझेल ३ रुपयांनी महाग
नायरा एनर्जीने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ५ रुपयांनी आणि डिझेलच्या दरात ३ रुपयांनी वाढ केली आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींना प्रतिसाद म्हणून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवणारी ही पहिली तेल कंपनी आहे. कंपनीचे देशभरात ६,९६७ पंप आहेत. यापैकी सर्वाधिक पंप पश्चिम भारतातील गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये असून, त्याखालोखाल दक्षिण भारतातील कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि तेलंगणा यांचा क्रमांक लागतो.
Todays Gold-Silver Price: भारतात सोन्या-चांदीच्या दरात घसरण, ग्राहकांसाठी खरेदीची मोठी संधी
एलपीजी उत्पादन वाढले, आयातीची गरज घटली
दिल्ली, नवराष्ट्र ब्यूरो. एलपीजीची कसलीही टंचाई नाही. मंत्रालयाने जारी केलेल्या ‘एलपीजी नियंत्रण आदेशा’चे अनुसरण करत देशांतर्गत रिफायनरी उत्पादन ४० टक्क्यांनी वाढवले आहे. यामुळे एलपीजीचे उत्पादन ५० टीएमटी पर्यंत वाढले आहे, जे आपल्या एकूण गरजेच्या ६० टक्क्यांपेक्षा जास्त आहे; प्रत्यक्षात आपली गरज ८० टीएमटी आहे.
८०० टीएमटी एलपीजी परदेशातून येणार
देशांतर्गत उत्पादनाव्यतिरिक्त ८०० टीएमटी इतक्या एलपीजीचा कार्गो पुरवठा परदेशातून येणे निश्चित झाले असून तो सध्या अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांतून भारताच्या दिशेने येत आहे. हा पुरवठा भारतातील २२ एलपीजी आयात केंद्रांवर उतरवला जाईल. तेल कंपन्या ५० लाखांपेक्षा जास्त एलपीजी सिलिंडर्सचा यशस्वी पुरवठा करत आहेत. ग्राहकांनी केलेल्या अतिरिक्त बुकिंगमुळे मागणी वाढली आहे.