नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पामध्ये (Union Budget 2023) गरीबांचाही विचार केला आहे. गरीबांना मोफत अन्नधान्य आणि स्वस्तात घरे मिळावी यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं अर्थसंकल्पामध्ये दिसत आहे. सरकार गरीब लोकांसाठी पीएम आवास योजनेच्या माध्यमातून (PM Awas Yojana) घर उपलब्ध करत आहे. यावर्षी अर्थसंकल्पामध्ये पीएम आवास योजनेवरचा खर्च वाढवण्यात आला आहे. अर्थमंत्र्यांनी पीएम आवास योजनेवरील खर्चाची रक्कम 66 टक्क्यांनी वाढवून 79,000 कोटी रुपये इतकी केली आहे. ही पीएम आवास योजनेती मोठी वाढ आहे.
मोफत अन्न-धान्य
कोरोनाकाळात मोफत अन्न-धान्य पुरवठा योजनेसह कोणी उपाशीपोटी झोपणार नाही, याची आम्ही काळजी घेतली असं निर्मला सीतारमण यांनी संसदेत सांगितलं. गेल्या 28 महिन्यांत 80 कोटी लोकांना मोफत धान्य देण्यात आले. आजच्या अर्थसंकल्पात सुरुवातीलाच अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी गरीबांसाठी, सामान्यांसाठी एक महत्वाची घोषणा केली. पीएम गरीब कल्याण अन्न योजना वर्षभर सुरु राहणार आहे. ही योजना 2 लाख कोटींची योजना आहे. भारतीय अर्थव्यवस्था अधिक मजबूत झाली आहे, त्याचा परिणाम लोकांच्या राहणीमानावर दिसत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
बचत गट
ग्रामीण भागातील महिलांसाठी 81 लाख बचत गटांना मदत मिळाली आहे त्यात आणखी वाढ करण्यात येणार आहे. मागील काही वर्षापासून ग्रामीण भागात बचत गटाचे जाळे मोठ्या प्रमाणात आहे. याला आणखी बळ देणार आहे. बचत गटांना सरकारने बळ दिलं आहे. बचत गटामुळं महिलांचे अधिक सक्षमीकरण होण्याकडे कल असेल. तसेच बचत गटांचे महत्व वाढवणार आहे.
घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या किंमतीत वाढ होणार नसल्याचंही अर्थसंकल्पामध्ये सांगण्यात आलं. 47.8 कोटी जन धन खाती उघडण्यात आल्याचंही सांगण्यात आलं.
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शाळा
येत्या तीन वर्षांत आदिवासी विद्यार्थ्यांना आधार देणाऱ्या 740 एकलव्य मॉडेल शाळांसाठी 38 हजार 800 शिक्षक व सहाय्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. तसेच 44 कोटी 60 लाख नागरिकांना जीवनविम्याचं कवच देणार असल्याचंही जाहीर करण्यात आलं.