PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी(फोटो-सोशल मीडिया)
IND VS PAK, Asia Cup Trophy Dispute : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप ट्रॉफीबाबतचा वाद अद्यापही निवळलेला नाही. भारताला आशिया कप जेतेपदाची ट्रॉफी मिळालेली नाही. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष मोहसीन नक्वी हे अलिकडच्या आशिया कप विजेत्याच्या ट्रॉफीबाबत अत्यंत हट्टी झाले असल्याचेही दिसून येत आहेत. त्यांनी पुन्हा सांगितले की जर भारताला टी-२० आशिया कप २००५ ट्रॉफी हवी असेल तर ती त्यांच्याकडून दुबईमध्ये स्वीकारायला हवी. मोहसीन नक्वी यांनी सांगितले की, “ट्रॉफी हस्तांतरणाची स्थिती कायम आहे. जर भारताला ट्रॉफी पाहिजे असेल तर त्यांनी त्यांचा कर्णधार दुबईला पाठवावा आणि माझ्याकडून ती स्वीकारावी.”
दुबईमध्ये २८ सप्टेंबर रोजी खेळवण्यात आलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप फायनलमध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध ५ विकेट्सने विजय मिळवला. विजेतेपद जिंकल्यानंतर, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने सादरीकरण समारंभात मोहसीन नक्वीकडून ट्रॉफी न स्वीकारताच भारतात परतला होता. तेव्हापासून, जेतेपदाची ट्रॉफी दुबईतील आशियाई क्रिकेट परिषद कार्यालयात आहे. नक्वी यांच्याकडून दावा करण्यात आला आहे की, आशियाई क्रिकेट परिषदचे अध्यक्ष म्हणून, ट्रॉफी सादर करण्याचा अधिकार त्यांचाच आहे.
ज्युनियर आशिया कप स्पर्धे दरम्यान भारतीय अंडर-१९ खेळाडूंच्या वाईट वर्तनाबद्दल पाकिस्तान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे तक्रार करणार असल्याचे देखील नक्वी यांनी सांगितले आहे. याबाबत बोलताना नक्वी म्हणाले की, “ज्युनियर आशिया कप फायनल दरम्यान भारतीय ज्युनियर खेळाडूंच्या वर्तनाबद्दल आम्ही आयसीसीला पत्र लिहिणार आहोत, जे वर्तन अस्वीकार्य होते.”
हेही वाचा : ‘कर्णधार होण्यास लायक नाही…’ शुभमन गिलबद्दल इंग्लंडच्या ‘या’ माजी दिग्गज खेळाडूच्या विधानाने उडाली खळबळ
आशिया कप टॉस दरम्यान भारताचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानी कर्णधार सलमान आगासोबत हस्तांदोलन करणे टाळले होते. ज्यामुळे वादाला तोंड फुटले. नक्वी म्हणाले की भारताशी कोणती देखील तडजोड करण्यात येणार नाही. या विषयावर नक्वी म्हणाले की, “जर भारताने त्यांच्या खेळाडूंना आमच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करणे टाळले तर ते समानतेच्या आधारावर हाताळले जाईल आणि कोणतीही तडजोड केली जाणार नाही. आम्हाला त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यात देखील रस नाही.”






