तुम्हीही चुकीचा आयटीआर भरलाय का? आयकर विभाग पाठवतंय नोटीस... हलक्यात घेऊ नका!
इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरल्यानंतर, करदाते सध्या रिफंडची वाट पाहत आहेत. ज्यांचा टीडीएस कंपनीने कापला आहे. तर दुसरीकडे, ज्यांनी आयटीआर भरताना काही चूक केली आहे, अशा लोकांना आयकर विभागाकडून नोटिसा मिळू लागल्या आहेत. यामध्ये चुकीच्या आयटीआर फॉर्मची निवड देखील समाविष्ट आहे. रिटर्न भरताना तुम्ही चुकीचा फॉर्म निवडला असेल, तर तुम्हालाही कदाचित नोटीसही मिळाली असेल. आयकर विभाग ही नोटीस नोंदणीकृत ई-मेल आयडीवर पाठवत आहे.
काय म्हटलंय आयकर विभागाने मेलमध्ये?
आयकर विभागाने ई-मेलवर पाठवलेल्या नोटीसमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की, रिटर्न भरताना तुम्ही निवडलेला फॉर्म चुकीचा आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला चूक दुरुस्त करून, पुन्हा आयटीआर भरावा लागणार आहे. यासाठी कोणतेही शुल्क किंवा दंड भरावा लागणार नाही. तुम्ही योग्य फॉर्म फक्त ऑनलाइन भरू शकतात.
(फोटो सौजन्य : istock)
हेही वाचा : बाबा रामदेव यांच्यासह ‘हे’ आहे देशातील 5 श्रीमंत आध्यात्मिक गुरु; वाचा… त्यांची संपत्ती?
काय चूक झाली, सर्व समजणार
तुम्ही कोणताही आयटीआर फॉर्म निवडला असला, तरी तो का चुकीचा होता? याची संपूर्ण माहिती इन्कम टॅक्सकडून आलेल्या मेलमध्ये देण्यात आली आहे. वास्तविक, फॉर्म 16 आणि फॉर्म 26AS मध्ये उत्पन्नाच्या स्त्रोताशी संबंधित संपूर्ण माहिती असते. अशा परिस्थितीत अनेक वेळा जाणूनबुजून किंवा नकळत लोक चुकीचा फॉर्म निवडतात. त्यावेळी योग्य रिटर्न भरला जातो. पण नंतर आयकर विभागाकडून फॉर्मची छाननी केली असता, चुकीचा आयटीआर फॉर्म निवडल्याचे आढळून येते.
टेन्शन घेऊ नका
चुकीचा आयटीआर फॉर्म भरल्यानंतर मिळालेल्या नोटीसबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही. नोटीसमध्ये तुम्ही कोणती चूक केली आहे आणि तुम्ही ती कशी दुरुस्त करू शकता हे स्पष्टपणे नमूद केले आहे. ही चूक सुधारण्याची शेवटची तारीखही ई-मेलमध्ये दिली आहे. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही निर्धारित तारखेपर्यंत ही चूक सुधारली नाही तर तुमचे रिटर्न अवैध मानले जाईल. यानंतर तुम्हाला दंडासह रिटर्न भरावा लागणार आहे.
हेही वाचा : भारतीय कंपन्यांचा जगभरात डंका; जेएसडब्ल्यूने खरेदी केली ऑस्ट्रेलियाची ‘ही’ कंपनी!
31 डिसेंबरपर्यंत भरता येणार दंडासह आयटीआर
तुम्ही अजून तुमचा आयटीआर दाखल केला नसेल, तर तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत उशीरा आयटीआर दाखल करू शकतात. मात्र, यासाठी तुम्हाला ५ हजार रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागणार आहे. हा दंड तुमचे उत्पन्न किती आहे? यावर अवलंबून असेल. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 5 लाखांपर्यंत आहे. त्यांना 1000 रुपयांपर्यंत दंड आकारला जातो. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त आहे. त्यांना 5,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जातो.