झोमॅटोचा जलवा..! वर्षभरात नफ्यात 2 कोटीवरून तब्बल 253 कोटीपर्यंत वाढ; शेअरमध्येही तेजी!
आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या पहिल्या तिमाहीत झोमॅटोचा नफा वार्षिक आधारावर १२६ पटीने वाढला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीने २५३ कोटींचा निव्वळ नफा कमावला आहे. तसेच झोमॅटोचे महसुली उत्पन्न ७५ टक्क्यांनी वाढून ४,२०६ कोटी रुपयांवर पोहचले आहे. अशातच आता झोमॅटो कंपनीने आपल्या ग्राहकांना खरेदीपासून ते राहण्यापर्यंतच्या सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कंपनीने एक अँप सुरु केले असून, या ॲपच्या माध्यमातून ग्राहकांना जेवण, चित्रपट तिकीट बुकिंग, कार्यक्रम बुकिंग इत्यादींचा समावेश असणाऱ्या सुविधा दिल्या जाणार आहे.
काय म्हटलंय कंपनीने?
झोमॅटोचे सीईओ दीपंदर गोयल यांनी याबाबत बोलताना म्हटले आहे की, वर्षभरापूर्वी कंपनीचा नफा फक्त दोन कोटी रुपये होता. त्यानंतर सोशल मीडियावर कंपनीबाबत विविध प्रकारचे मीम्स व्हायरल होऊ लागले होते. काही युजर्सनी तर माझ्याकडून इतके पैसे घ्यायला हवे होते, असा सल्लाही दिला कंपनीला दिला होता. मात्र, आता कंपनीचे नशीब बदलले असून, झोमॅटोने रेकॉर्डब्रेक नफा नोंदवला आहे.
हेही वाचा : टोमॅटो शंभरी पार, ग्राहकांमध्ये असंतोष; केंद्र सरकारची दर नियंत्रणासाठी धावाधाव!
कंपनीचे शेअर्स १९ टक्क्यांनी वधारले
विशेष म्हणजे झोमॅटो कंपनीचे तिमाही निकाल समोर येताच, झोमॅटोच्या शेअर्सनी आज (ता.२) रॉकेटच्या स्पीडने उसळी घेतली आहे. एकीकडे एकीकडे भारतीय शेअर बाजारात घसरत होत असताना, दुसरीकडे आज ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटो या कंपनीचे शेअर्स १९ टक्क्यांनी वधारले आहेत. आज शेअर बाजारात कंपनीचे शेअर २७८.७ रुपयांवर पोहोचले आहे. जून तिमाहीतील चांगल्या नफ्यानंतर शेअर्समध्ये तेजी वाढली असून, ब्रोकरेजदेखील या स्टॉकवर खुश दिसत आहेत.
कंपनीचा व्यवसाय विस्तारावर भर
झोमॅटोचे नवीन ॲप लॉन्च झालेले नाही. नवीन ॲपच्या लॉन्चिंगबाबत कंपनीकडून तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, ग्राहकांच्या जीवनशैलीत सुधारणा करण्यासह त्यांना सुविधा देण्यासाठी कंपनी आपला व्यवसाय विस्तारित करण्याच्या योजनेवर काम करत आहे. त्याचाच एक भेगा म्हणून जेवण, चित्रपट तिकीट बुकिंग, कार्यक्रम बुकिंग इत्यादींचा समावेश असणाऱ्या अँपची सुविधा ग्राहकांना देण्याचा विचार आहे.