Dream 11 (Photo Credit- X)
Online Gaming Bill 2025: लोकसभेने २० ऑगस्ट रोजी आणि राज्यसभेने २१ ऑगस्ट रोजी ऑनलाइन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन विधेयक २०२५ (Online Gaming Bill 2025) मंजूर केले आहे. यामुळे, ऑनलाइन पैसे कमावणाऱ्या गेम्सवर आता बंदी येणार आहे. हा विधेयक आता कायदा बनल्याने, देशातील अनेक लोकप्रिय फॅन्टसी गेमिंग प्लॅटफॉर्म (Fantasy Gaming Platforms) बंद होण्याची शक्यता आहे, ज्यात ड्रीम ११ (Dream 11) आघाडीवर आहे. यामुळे एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे: जर ड्रीम ११ बंद झाले, तर त्याचा परिणाम भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (BCCI) होईल का?
गेल्या काही वर्षांत ऑनलाइन गेमिंगच्या जगात मोठी क्रांती घडवणाऱ्या ड्रीम ११ ने भारतीय क्रिकेटमध्येही जोरदार गुंतवणूक केली आहे. २०२३ मध्ये, ड्रीम ११ ने बीसीसीआयसोबत ३५८ कोटी रुपयांचा तीन वर्षांचा करार केला. या करारानुसार, ड्रीम ११ भारतीय क्रिकेट संघाचा टायटल स्पॉन्सर (Title Sponsor) बनला, आणि तेव्हापासून भारतीय संघाच्या जर्सीवर ड्रीम ११ चे नाव दिसत आहे. हा करार २०२६ मध्ये संपणार आहे, मात्र त्याआधीच हे विधेयक मंजूर झाल्याने बीसीसीआयला किती नुकसान होईल याची चर्चा सुरू झाली आहे.
ड्रीम ११ ही कंपनी पूर्णपणे ऑनलाइन मनी गेमिंगवर आधारित आहे आणि आता यावर बंदी येणार असल्याने कंपनीला मोठा फटका बसणार आहे. कंपनी बीसीसीआयसोबतचा करार तात्काळ रद्द करेल की नाही हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. सध्या या कराराला एक वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे, आणि बीसीसीआयला आतापर्यंत अर्ध्याहून अधिक रक्कम मिळाली आहे. मात्र, उर्वरित रक्कम कराराच्या भवितव्यावर अवलंबून असेल.
या नवीन नियमांचा फटका केवळ ड्रीम ११ लाच नाही, तर माय ११ सर्कल (My 11 Circle) सारख्या इतर मोठ्या ऑनलाइन गेमिंग कंपन्यांनाही बसू शकतो. माय ११ सर्कलचाही बीसीसीआयसोबत करार आहे. २०२४ मध्ये, आयपीएलने (IPL) पाच हंगामांसाठी माय ११ सर्कलसोबत ६२५ कोटी रुपयांचा करार केला होता. या करारानुसार, माय ११ सर्कल आयपीएलचे मुख्य फॅन्टसी गेमिंग प्रायोजक बनले.
या कराराला आतापर्यंत केवळ दोन हंगाम पूर्ण झाले आहेत, आणि अजूनही तीन हंगामांचा करार शिल्लक आहे. नवीन कायद्यामुळे कंपनी पुढे काय निर्णय घेते यावर या कराराचे भविष्य अवलंबून आहे. या कायद्यामुळे केवळ ड्रीम ११ आणि माय ११ सर्कलच नाही, तर संपूर्ण ऑनलाइन गेमिंग उद्योगावर मोठे संकट आले आहे. याचा थेट परिणाम बीसीसीआयच्या उत्पन्नावरही होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे भारतीय क्रिकेटच्या आर्थिक व्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो.