फोटो सौजन्य - Social Media
उच्च शिक्षण घेण्यासाठी आज अनेक विद्यार्थी शिक्षण कर्ज (Education Loan) घेण्यावर अवलंबून आहेत. मोठ्या विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी लाखो रुपयांची फी आवश्यक असते आणि ती प्रत्येक कुटुंब त्वरित भागवू शकत नाही. अशा वेळी बँका आणि वित्तीय संस्था देत असलेले एज्युकेशन लोन मोठा आधार ठरतो. परंतु अनेक वेळा कर्ज अर्ज मंजूर न होता नाकारला जातो, ज्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींसोबत मानसिक तणावाला सामोरे जावे लागते. अर्ज नाकारले जाण्यामागे काही ठराविक कारणे असतात.
कधी कधी बँकेतील तांत्रिक चुका किंवा प्रक्रियेमधील त्रुटीमुळे कर्ज अर्ज रिजेक्ट होतो. अशा वेळी त्वरित बँकेशी संपर्क साधून प्रश्न सोडवता येतो. तसेच अपूर्ण कागदपत्रे, प्रवेशपत्रातील गोंधळ किंवा फी स्ट्रक्चरमधील त्रुटी यामुळेही अर्ज नाकारला जाऊ शकतो. याशिवाय क्रेडिट हिस्ट्री व CIBIL स्कोअर यांचा कर्ज मंजुरीत मोठा वाटा असतो. विद्यार्थी, पालक किंवा हमीदार यांनी यापूर्वी घेतलेले कर्ज वेळेत न फेडल्यास त्यांच्या क्रेडिट प्रोफाइलवर परिणाम होतो आणि नवीन कर्ज अर्ज फेटाळला जाऊ शकतो.
बँका सामान्यतः अशाच कोर्सेस व विद्यापीठांना प्राधान्य देतात ज्यांना रोजगाराच्या चांगल्या संधी आहेत, त्यामुळे बाजारात कमी मागणी असलेल्या कोर्ससाठी लोन मंजूर होण्याची शक्यता कमी असते. त्याशिवाय मोठ्या रकमेच्या कर्जासाठी हमीदार किंवा तारण आवश्यक असते; ते उपलब्ध नसल्यास अर्ज नाकारला जातो. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची उत्पन्नक्षमता देखील बँक तपासते आणि परतफेडीची क्षमता कमी असल्यास कर्ज मंजूर होत नाही. अर्जामध्ये चुकीची किंवा अपुरी माहिती भरली तरी नकार मिळू शकतो.
कधी कधी बँकांच्या धोरणांमधील मर्यादा किंवा बजेटअभावीही अनेक अर्ज नाकारले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षण कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रे पूर्ण ठेवणे, योग्य कोर्स व विद्यापीठाची निवड करणे, तसेच आपली क्रेडिट हिस्ट्री सुधारलेली ठेवणे महत्त्वाचे आहे. तयारीने केलेला अर्ज मंजूर होण्याची शक्यता खूपच जास्त असते आणि त्यामुळे उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळवणे सोपे ठरते.