
मोठी बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षेत मोठा बदल, परीक्षा केंद्रांवरील शिक्षकांच्या अदलाबदलीस स्थगिती
याबाबत वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या स्थापनेस शाळांनी सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्र संचालक म्हणून काम करणाऱ्या मुख्याध्यापकांना इतर परीक्षा कार्यातून सूट देण्यात येईल, तसेच पेपर तपासणीसाठी मुख्याध्यापकांची माहिती पुढील दोन दिवसांत अद्यावत करण्यात येणार आहे. मुख्याध्यापक महामंडळाच्या मागणीनुसार, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी स्टेशनरी खर्चासाठी रक्कम उपलब्ध करून देण्याचे निर्णय घेतले गेले आहेत. उत्तरपत्रिका पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस कर्मचारी केंद्रावर उपस्थित राहतील.
सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सीमावर्ती विद्यार्थ्यांची नोंद, विद्यार्थ्यांचे नाव, वडिलांचे नाव व आडनाव” या क्रमाने केली जाईल, ज्यामुळे गुणपत्रक व प्रमाणपत्र एकत्र मिळेल. प्रश्नपत्रिका वाहतूक करण्यासाठी विशेष वाहनांची सोय व परीक्षा केंद्रावर पाणीपुरवठ्यासाठी बंद असलेली अनुदाने पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी सर्व मागण्या मान्य केल्याचे सांगितले असून, आदेश विभागीय अध्यक्षांना त्वरित देण्यात येणार आहेत.
बैठकीत मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर, उपाध्यक्ष सुनील पंडित, डॉ. डी. एस. घुगरे, सचिव संजयकुमार झांबरे, कोल्हापूर विभाग मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष डॉ. बी. बी. पाटील, पुणे विभागीय मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष पाटणे, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रसाद गायकवाड, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पवार, सांगली जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव संतोष नाईक, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे, अहिल्यानगर महापालिका क्षेत्राचे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव दर्शक , पुंडलिक मेमाणे, शिक्षणतज्ञ महेंद्र गणपुले, तसेच राज्य शिक्षण मंडळाचे सचिव दीपक माळी, सहसचिव प्रमोद गोफणे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.