फोटो सौजन्य - Social Media
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षांबाबत महत्त्वाची अधिकृत सूचना जारी करण्यात आली आहे. मंडळाच्या निर्णयानुसार, चालू शैक्षणिक वर्षातील बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारीपासून सुरू होणार असून ती १८ मार्च २०२६ पर्यंत चालणार आहे. या पार्श्वभूमीवर बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हॉल तिकिटांचे वाटप सुरू करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून हॉल तिकिटांच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
यंदा बारावीच्या परीक्षेसाठी हॉल तिकिटे ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मात्र, केवळ ऑनलाइन डाउनलोड केलेले हॉल तिकिट परीक्षेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही, असे मंडळाने स्पष्ट केले आहे. संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना हॉल तिकिटाची छापील प्रत देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, हॉल तिकिटाच्या प्रिंटसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारू नये, अशा स्पष्ट सूचना मंडळाने सर्व महाविद्यालयांना दिल्या आहेत. हॉल तिकिटांचे वाटप पूर्णपणे मोफत असणार आहे.
बारावीची परीक्षा देण्यासाठी हॉल तिकिट हा अत्यावश्यक दस्तऐवज आहे. कोणत्याही परिस्थितीत हॉल तिकिटाशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही, असे मंडळाने ठामपणे सांगितले आहे. याशिवाय, हॉल तिकिटाबाबत मंडळाने आणखी एक महत्त्वाची अट घातली आहे. विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर मुख्याध्यापकांची स्वाक्षरी व अधिकृत शिक्का असणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांचा फोटो असलेल्या हॉल तिकिटावर खाली मुख्याध्यापकांची सही आणि शिक्का नसल्यास ते हॉल तिकिट अवैध मानले जाईल.
अशा परिस्थितीत संबंधित विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारला जाऊ शकतो, असा इशाराही मंडळाने दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हॉल तिकिट प्राप्त झाल्यानंतर त्यावरील नाव, विषय, बैठक क्रमांक, परीक्षा केंद्र आदी सर्व तपशील काळजीपूर्वक तपासावेत. तसेच, वेळेत मुख्याध्यापकांची स्वाक्षरी व शिक्का घेऊनच परीक्षा केंद्रावर जाणे अत्यंत आवश्यक आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, बारावीच्या परीक्षेसोबतच दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दहावीच्या परीक्षांची हॉल तिकिटेही लवकरच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे दहावीचे विद्यार्थी व पालकांनीही हॉल तिकिटांबाबत सतर्क राहावे, असे सांगण्यात आले आहे.
यंदाच्या वर्षी राज्यातील छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, लातूर, अमरावती आणि कोकण अशा नऊ विभागांमार्फत बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी मंडळाकडून सर्व स्तरांवर तयारी सुरू असून संबंधित विभागीय मंडळे व महाविद्यालयांना वेळेत हॉल तिकिट वितरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.






