
फोटो सौजन्य - Social Media
भारतातील सामाजिक क्षेत्रात झपाट्याने बदल होत असून, पारंपरिक धर्मादाय मॉडेल्सऐवजी परिणामकारक, हक्काधारित आणि नाविन्यपूर्ण विकासाच्या संकल्पनांना अधिक महत्त्व मिळत आहे. सामाजिक उद्योजकता, इम्पॅक्ट इन्व्हेस्टिंग, ईएसजी (ESG), सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) आणि कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) यांसारख्या नव्या प्रवाहांमुळे सामाजिक विकासाची दिशा आणि व्याप्ती दोन्ही बदलत आहेत. या बदलत्या गरजा लक्षात घेऊन भारतीय विद्या भवनच्या एस. पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (एसपीजेआयएमआर) ने आपल्या पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इन डेव्हलपमेंट मॅनेजमेंट (पीजीपीडीएम) च्या अभ्यासक्रमात व्यापक सुधारणा करत फेब्रुवारी २०२७ मध्ये सुरू होणाऱ्या बॅच २८साठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे.
एएसीएसबी, एएमबीए आणि इक्विस या आंतरराष्ट्रीय ‘ट्रिपल क्राउन’ मान्यतेसह भारतातील हा एकमेव डेव्हलपमेंट मॅनेजमेंट अभ्यासक्रम आहे. मे २०२६ मध्ये संस्थेने आपल्या सिल्व्हर ज्युबिली बॅचचे पदवीदान पूर्ण करत २५ वर्षांचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. या अभ्यासक्रमात स्वयंसेवी संस्थांचे प्रमुख, शासकीय अधिकारी, संयुक्त राष्ट्रसंघातील व्यावसायिक, सामाजिक उद्योजक, सामाजिक प्रभाव सल्लागार आणि सीएसआर क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी सहभागी होत असल्याने विविध क्षेत्रांतील अनुभवांची देवाणघेवाण आणि सहयोगाला चालना मिळते.
पीजीपीडीएमचे अध्यक्ष प्रा. मनोजकुमार मेश्राम यांच्या मते, आजच्या काळात सामाजिक क्षेत्र स्वतंत्रपणे कार्य करत नसून विविध क्षेत्रांतील समन्वय ही काळाची गरज बनली आहे. हा अभ्यासक्रम सामाजिक परिवर्तन घडवून आणणाऱ्या व्यावसायिकांचा सक्षम समुदाय तयार करत असून, विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांना एकत्र आणून प्रत्यक्ष समस्यांवर प्रभावी आणि शाश्वत उपाय शोधण्यास मदत करतो.
सुधारित अभ्यासक्रमात ईएसजी, विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सामाजिक उद्योजकता, सार्वजनिक धोरण आणि संवाद कौशल्ये या पाच प्रमुख घटकांवर विशेष भर देण्यात आला आहे. तसेच कार्यरत व्यावसायिकांसाठी निश्चित ऑनलाइन वर्ग वेळापत्रक, अद्ययावत मूल्यमापन पद्धती, धोरण, डेटा विश्लेषण, वित्तीय अनुपालन आणि संस्थात्मक व्यवस्थापनाशी संबंधित प्रगत पर्यायी विषयांचा समावेश करण्यात आला आहे. नेतृत्व, संवाद आणि व्यावसायिक लेखन या कौशल्यांचा विकास करण्यासाठी तीन नवीन प्रात्यक्षिक प्रयोगशाळाही सुरू करण्यात आल्या आहेत.
या कार्यक्रमातील आणखी एक महत्त्वपूर्ण बदल म्हणजे वर्षभर चालणारा सोशल इम्पॅक्ट प्रोजेक्ट. एसपीजेआयएमआरच्या पूर्णवेळ व्यवस्थापन विद्यार्थ्यांसोबत संयुक्तपणे राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून विकास व्यवस्थापन आणि कॉर्पोरेट व्यवस्थापन यांचा संगम साधला जाणार असून, गुंतागुंतीच्या सामाजिक समस्यांवर बहुआयामी उपाय विकसित करण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय, यापुढे संस्था वर्षातून दोन प्रवेशांऐवजी दरवर्षी फेब्रुवारीमध्ये एकच प्रवेश प्रक्रिया राबवणार आहे. त्यामुळे सुमारे १०० व्यावसायिकांचा मोठा समूह एकाच बॅचमध्ये शिक्षण घेईल आणि नेटवर्किंग, ज्ञानाची देवाणघेवाण तसेच आंतर-क्षेत्रीय सहकार्याला अधिक बळ मिळेल.
बॅच २८सह हा कार्यक्रम आपल्या १६व्या वर्षात प्रवेश करत आहे. या अभ्यासक्रमातून घडलेले अनेक माजी विद्यार्थी स्वयंसेवी संस्था, सामाजिक उपक्रम, सीएसआर विभाग तसेच विविध संस्थांमध्ये नेतृत्व आणि सीएक्सओ पदांवर कार्यरत आहेत. संस्थेच्या मते, बॅच २८साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, पात्रता निकष आणि अर्जाची सविस्तर माहिती एसपीजेआयएमआरच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.