
फोटो सौजन्य - Social Media
सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे राज्यमंत्री मिसाळ आणि बाडेन-वुटेमबर्ग राज्याचे मंत्री मॅनफ्रेड लुखा यांनी संयुक्त जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमार, आयुक्त डॉ. अनिल भंडारी, संचालक डॉ. अजय चंदनवाले, सहसचिव डॉ. सुवर्णा खरात, अर्चना बडे, धीरेंद्र रामटेके यांच्यासह जर्मन प्रतिनिधी मंडळ व विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Baden-Württemberg and Maharashtra)
माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, कराराअंतर्गत भाषा प्रशिक्षण, कौशल्यविकास, प्रमाणपत्र मान्यतेची प्रक्रिया सुलभ करणे आणि जर्मनीत काम करणाऱ्या नर्सेसच्या सन्मान व संरक्षणासाठी विशेष उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. उच्च दर्जाचे नर्सिंग मनुष्यबळ तयार करणे ही या उपक्रमाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. दोन्ही राज्यांतील नर्सिंग शिक्षण संस्था आणि विद्यापीठांदरम्यान विद्यार्थी–प्राध्यापक आदानप्रदान, संयुक्त प्रशिक्षण, अभ्यासदौरे आणि संशोधन उपक्रम राबवून शिक्षणाची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यात येणार आहे.
जर्मन मंत्री मॅनफ्रेड लुखा यांनी सांगितले की, आरोग्यसेवा क्षेत्रातील कौशल्याधारित शिक्षणाचा विस्तार करणे, संशोधन वाढवणे आणि परदेशी रोजगार संधी निर्माण करणे यावर विशेष भर देण्यात येणार आहे. या सहकार्यामुळे तरुणांना विदेशात करिअर उभारण्याची संधी मिळेल आणि आरोग्य क्षेत्रासाठी अधिक सक्षम मनुष्यबळ तयार होईल.
बाडेन-वुटेमबर्ग राज्याचे प्रतिनिधी ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२५ दरम्यान महाराष्ट्राच्या दौर्यावर होते. या भेटीत नर्सिंग क्षेत्रातील सहकार्य वाढवणे व कौशल्य विकासासाठी नवीन मार्ग उभारणे यावर चर्चा झाली. या संयुक्त उपक्रमामुळे महाराष्ट्र आणि बाडेन-वुटेमबर्ग राज्यांदरम्यान आरोग्य व नर्सिंग क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय भागीदारी आणखी मजबूत होणार आहे.