फोटो सौजन्य - Social Media
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS), राज्यशास्त्र विभाग, रेड रिबन क्लब आणि ग्रामीण एड्स नियंत्रण कार्यक्रम केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या ‘संविधान तसेच एड्स जनजागरण अभियानाचा’ समारोप आंतरराष्ट्रीय एड्स दिनानिमित्त सोमवारी (१ डिसेंबर) पार पडला. या वेळी डॉ. निलेश निंबाळकर यांनी संविधान जनजागरण मार्गदर्शन करताना “युवा पिढीने संविधानाशी जुळणे अत्यावश्यक आहे” असा ठळक संदेश दिला.
डॉ. निंबाळकर यांनी प्रास्ताविकात २६ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या जनजागरण उपक्रमाचा सविस्तर आढावा घेतला. महाविद्यालयात सलग काही दिवस संविधान साक्षरता, अधिकार-कर्तव्ये, जनजागृती रॅली आणि विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले. त्यांनी सांगितले की, आजचा युवक संविधानाविषयी जागरूक राहिला तर देशातील लोकशाही अधिक बळकट होईल.
वक्तृत्व आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
कार्यक्रमादरम्यान वक्तृत्व आणि प्रश्नमंजुषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
समारोप कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश मायी यांनी भूषविले. जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथील एचआयव्ही-एड्स समुपदेशक डॉ. बोंबटकर आणि समुपदेशिका कु. कुलकर्णी यांसह NSS कार्यक्रमाधिकारी प्रा. निलेश निंबाळकर, प्रा. विनोद बावस्कर, अर्चना जोशी, प्रा. विनय उमरकर, प्रा. सचिन उनडकाट, प्रा. समीर तडवी, प्रा. रामेश्वर सायखेडे आणि प्रा. सिद्धार्थ इंगळे उपस्थित होते. तसेच प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
डॉ. बोंबटकर यांनी विद्यार्थ्यांना एचआयव्ही/एड्सबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यामध्ये विषाणूचा प्रसार, प्रतिबंध, उपचाराची गरज, तसेच समाजातील गैरसमज दूर करण्यावर विशेष भर दिला. विद्यार्थ्यांनी स्वतःसह समाजालाही जागरूक करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. समारोपात शैक्षणिक सत्र २०२५–२६ साठी नवीन रेड रिबन क्लबची घोषणा करण्यात आली. रासेयो स्वयंसेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सक्रिय सहभागामुळे संपूर्ण जनजागरण अभियान प्रभावीपणे पार पडल्याचे आयोजकांनी सांगितले.






