Artificial Intelligence in Engineering
अभियांत्रिकी मध्ये रचना तयार करणे, गणिती विश्लेषण, संगणकीय आज्ञावली लिहिणे, नमुने तयार करणे, यंत्रांची तपासणी, माहितीचे विश्लेषण आणि उत्पादन प्रक्रियेचे नियंत्रण यांसारखी अनेक कामे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने अधिक जलद आणि अचूकपणे करता येत आहेत. त्यामुळे पुनरावृत्तीची आणि नियमित स्वरूपाची काही कामे स्वयंचलित होतील. मात्र, त्याच बरोबर बदलत्या ग्राहकांच्या गरजा हे सध्याच्या अभियंत्यांसमोरील मोठे आव्हान आहे. ग्राहकांच्या आवडी-निवडी वेगाने बदलत आहेत. जागतिकीकरणामुळे बाजारपेठेतील स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे अभियंत्यांना तांत्रिक ज्ञानासोबत ग्राहकांच्या गरजा, बाजारपेठ आणि बदलते तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता माझा स्पर्धक आहे,’ असा विचार करण्याऐवजी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता माझे काम अधिक सक्षम करणारे साधन आहे,’ असा दृष्टिकोन ठेवला पाहिजे. अभियांत्रिकीच्या प्रत्येक शाखेतील विद्यार्थ्यांनी आपल्या विषयातील सखोल ज्ञानासोबत नव्या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर शिकणे, प्रकल्पाधारित शिक्षण घेणे आणि सतत नवीन कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे, असे प्रा. उद्धव शिद यांनी सांगितले.
भविष्यातील अभियंत्यांनी पारंपरिक अभियांत्रिकीचे मूलभूत ज्ञान मजबूत करण्यासोबत एआय, डेटा विश्लेषण, स्वयंचलन (ऑटोमेशन) आणि डिजिटल तंत्रज्ञान आत्मसात करावे. तंत्रज्ञान बदलत असले तरी समस्या सोडविण्याची क्षमता, सर्जनशीलता आणि ग्राहकांच्या गरजा समजून घेण्याचे कौशल्य महत्त्वाचे राहणार आहे, असे गणेश काकांडीकर यांनी सांगितले.
अभियांत्रिकी प्राध्यापक, प्रा. डॉ. गणेश काकांडीकर म्हणाले की, “एआयमुळे अभियांत्रिकीची मूलभूत गरज संपणार नाही. वस्तू, घरे, यंत्रणा आणि विविध उत्पादनांची निर्मिती करण्याचे काम अभियंत्यांचेच राहणार आहे. मात्र, एआयचा प्रभावी वापर करणारे अभियंते अधिक चांगली, स्मार्ट आणि मानवी गरजा लक्षात घेणारी उत्पादने तयार करू शकतील.”
पुणे, झील एज्युकेशन सोसायटीचे संचालक, प्रा. उद्धव शिंदे, म्हणाले की, “भविष्यात यशस्वी होणारा अभियंता तोच असेल, जो केवळ तंत्रज्ञानाचा वापर करणार नाही, तर तंत्रज्ञानाच्या मदतीने नवनवीन समस्या सोडवून समाजासाठी आणि उद्योगासाठी मूल्य निर्माण करेल. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता मुळे अभियंत्यांची भूमिका संपणार नसून ती अधिक सर्जनशील, निर्णयक्षम आणि नवोन्मेषी होणार आहे.”






