परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय, शैक्षणिक मदतीसाठी पुढे यावे; चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
मुंबई : राज्यातील अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेले आहे. अशा विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, सामाजिक जबाबदारी म्हणून शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना पुस्तके, कपडे आणि गणवेशासारखी मदत करावी, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला आहे. पुरामुळे कागदपत्रे, शैक्षणिक साहित्य वाहून गेलेल्या एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण बाधित होणार नाही, याची दक्षता घेतली जात असून परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सोबतच शैक्षणिक संस्थांनीही सामाजिक जबाबदारी म्हणून विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे.
मंत्रालयात राज्यातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणींचा आढावा घेण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. अनेक विद्यार्थ्यांचे साहित्य आणि शैक्षणिक साधने पुरामुळे नष्ट झाली आहेत. त्यामुळे महाविद्यालये, विद्यापीठे आणि खासगी शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, गणवेश अशा स्वरूपात सामाजिक कर्तव्य म्हणून मदत करावी. यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल आणि त्यांचे शिक्षण अखंडितपणे सुरू राहील.
तसेच राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, निरोगीपणा आणि नेतृत्वगुण विकसित व्हावेत यासाठी शालेय स्तरावर राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) प्रशिक्षण देण्यात यावे, असे निर्देश क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले.
माजी सैनिक, एनसीसीचे विद्यार्थी आणि क्रीडा शिक्षकांच्या मदतीने शाळेतील शिक्षकांना क्रीडा आणि कवायतीचे प्रशिक्षण द्यावे. विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच शारीरिक स्वास्थ्य, स्वयंशिस्त आणि प्रगल्भ विचार निर्माण होण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरेल. विद्यार्थ्यांना मैदानी खेळाची आवड निर्माण करण्यासाठी शालेय स्तरावर सक्तीचे क्रीडा प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. भविष्यात ऑलिम्पिकसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा, यासाठी विविध खेळांचे प्रशिक्षण देण्याचे धोरण तयार करावे. तसेच, क्रीडा शिक्षकांची संख्या वाढविण्यासाठी आणि क्रीडा स्पर्धांतील विजेत्या खेळाडूंना शिक्षक म्हणून नियुक्तीत विशेष सवलत देण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, असेही त्यांनी सांगितले.
एनसीसीचे प्रशिक्षण हे नेतृत्वगुण, चारित्र्यसंवर्धन, सेवाभाव आणि खिलाडूवृत्ती विकसित करण्याचे प्रभावी साधन आहे. देशाच्या आपत्कालीन परिस्थितीत सहाय्यभूत होऊ शकेल अशी शिस्तबद्ध प्रशिक्षित तरुण शक्ती घडविणे हे एनसीसीचे उद्दिष्ट आहे. तसेच, स्काऊट-गाईडच्या माध्यमातून ग्रामीण, शहरी आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये सहिष्णुता आणि नैतिक मूल्यांची जपणूक केली जाते. बैठकीदरम्यान देण्यात आलेल्या माहितीनुसार, वर्ष २०२३-२४ मध्ये राज्यातील विद्यालये व महाविद्यालयांमधील एनसीसी अंतर्गत एकूण १,००,८८४ विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत, यामध्ये कनिष्ठ विभागात ६१,३२८ आणि वरिष्ठ विभागात ३९,५०२ विद्यार्थी सहभागी आहेत.