फोटो सौजन्य - Social Media
विकसित भारत 2047 मिशनच्या यशस्वी पूर्ततेसाठी आणि भारताच्या 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचालीसाठी शिक्षण व तंत्रज्ञान यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या दृष्टीने महाराष्ट्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) विद्यापीठाची स्थापना करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी समिती गठीत करण्याच्या सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत.
मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी वेणूगोपाल रेड्डी, माहिती तंत्रज्ञान प्रधान सचिव पराग जैन-नैनुटीया, उपसचिव अशोक मांडे, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर आणि राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठाच्या स्थापनेसाठी समिती गठीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या विद्यापीठामार्फत विद्यार्थ्यांना अत्याधुनिक संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी आवश्यक ज्ञान व कौशल्य प्रदान केले जाईल. भविष्यातील गरजांना सामोरे जाण्यासाठी हे विद्यापीठ महत्त्वाची भूमिका बजावेल, असेही त्यांनी नमूद केले.
माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. एआय क्षेत्रात प्रभुत्व मिळविल्यास मोठ्या प्रमाणावर फायदेशीर रोजगार संधी निर्माण होऊ शकतात. महाराष्ट्रात देशातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठ स्थापन होणार असल्याचा त्यांना अभिमान वाटतो, असेही त्यांनी नमूद केले.
यासंदर्भात एक विशेष कृतीदल (टास्क फोर्स) स्थापन करण्यात आले आहे. या टास्क फोर्समध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी वेणूगोपाल रेड्डी, माहिती तंत्रज्ञान प्रधान सचिव पराग जैन-नैनुटीया, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक व परेश पागे यांचा समावेश आहे. हे विद्यापीठ महाराष्ट्राच्या शैक्षणिक व औद्योगिक विकासाला चालना देत विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण केंद्र बनेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.