
Image
Delhi Protest News: दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची कडक पावले उचलण्यात आली आहेत. जंतरमंतरवरील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलाच्या २३ हजारांहून अधिक जवानांना तैनात करण्यात आले आहे. तसेच दिल्लीत येणाऱ्या-जाणाऱ्या अनेक गाड्या (ट्रेन) रद्द करण्यात आल्या असून ५६ मेट्रो स्थानके तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत शहरातील अनेक नामांकित शाळांनी ऑफलाइन वर्ग रद्द केले आहेत आणि विद्यार्थ्यांना घरूनच अभ्यास करण्याचे निर्देश दिले आहेत. उत्तर प्रदेशातील प्रयागराज, हमीरपुर आणि हाथरस येथे सर्वपित्री अमावस्येनिमित्त शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
सरदार पटेल विद्यालय: १० ऑक्टोबर रोजी ६ वी ते १२ वीचे वर्ग ऑनलाइन माध्यमातून चालवले जातील आणि ‘एक्टिव्हिटी वीक’चा उद्घाटन कार्यक्रम तूर्तास टळला आहे.
रघुबीर सिंह जूनियर मॉडर्न स्कूल: विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून पालक-शिक्षक मिटिंगच्या (PTM) वेळेत बदल करण्यात आला असून, परिस्थिती सामान्य झाल्यावर नवीन तारीख जाहीर केली जाईल.
भारतीय विद्या भवनचा मेहता विद्यालय: जंतरमंतर जवळील आंदोलनामुळे शनिवारची स्पोर्ट्स प्रॅक्टिस आणि ९ वी ते १२ वीचे अतिरिक्त वर्ग रद्द करण्यात आले आहेत.
या आंदोलनामुळे दिल्लीतील संवेदनशील भागात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून सुरक्षेच्या कारणास्तव ५० हून अधिक मेट्रो स्थानकांचे गेट बंद ठेवण्यात आले आहेत.
प्रवाशांना घराबाहेर पडण्यापूर्वी मेट्रो आणि ट्रॅफिकची ताजी स्थिती तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच कानपूर, बिहार, जयपूर आणि इटारसीहून दिल्लीकडे येणाऱ्या अनेक प्रीमियम ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.