फोटो सौजन्य - Social Media
आजच्या स्पर्धात्मक युगात बहुतेक तरुण उच्च पगाराच्या कॉर्पोरेट नोकऱ्यांकडे आकर्षित होतात. मात्र भविष्य देसाई यांनी कोट्यवधी रुपयांचे पॅकेज असलेली करिअरची संधी बाजूला ठेवून देशसेवेचा मार्ग निवडला आणि पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत यश मिळवून आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले. भविष्य यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच नागरी सेवांमध्ये जाण्याचा ठाम निर्णय घेतला होता. परराष्ट्र मंत्री डॉ. सुब्रह्मण्यम जयशंकर यांच्या कार्यपद्धतीने आणि विचारांनी ते विशेष प्रेरित झाले. “देशासाठी निर्णय घेणाऱ्या व्यवस्थेचा भाग व्हायचे आहे,” असे स्पष्ट ध्येय त्यांनी लवकरच ठरवले. त्यांच्या मनात सुरुवातीपासूनच एकच लक्ष्य होते, पहिल्या १०० रँकमध्ये स्थान मिळवणे.
ध्येय ठरवल्यानंतर त्यांनी कोणतीही तडजोड न करता तयारी सुरू केली. दिवस-रात्र अभ्यास, विषयांची सखोल समज, सातत्यपूर्ण उजळणी आणि आत्मपरीक्षण यावर त्यांनी भर दिला. अपेक्षेपेक्षा अधिक मेहनत घेतल्यामुळे त्यांचे यशही अपेक्षेपेक्षा मोठे ठरले. भविष्य यांच्या यशामागे त्यांच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. त्यांचे वडील गोपाराम देसाई अजमेर येथील एमडीएस विद्यापीठात सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत, तर आई ललिता देसाई सरकारी शाळेत शिक्षिका आहेत. शैक्षणिक वातावरण, शिस्त आणि सकारात्मक पाठिंबा यामुळे भविष्यासाठी घरच एक प्रेरणास्थान ठरले. “माझ्या प्रत्येक टप्प्यावर कुटुंब माझ्या पाठीशी उभे राहिले,” असे भविष्य आवर्जून सांगतात.
लहानपणापासूनच भविष्यास पुस्तके वाचण्याची विशेष आवड होती. हीच सवय यूपीएससीच्या तयारीत त्यांच्या फार उपयोगी ठरली. विषय समजून घेणे, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करणे आणि चालू घडामोडींशी विषय जोडणे ही त्यांची अभ्यासपद्धती होती. विशेष म्हणजे त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासमध्ये प्रवेश न घेता घरी राहूनच अभ्यास केला. स्वतःच्या नोट्स, मानक पुस्तके आणि सातत्यपूर्ण सराव यावर त्यांनी विश्वास ठेवला.
अपयशाबाबत भविष्य यांचा दृष्टिकोन अत्यंत सकारात्मक आहे. “अपयश हे शेवट नसून शिकण्याची संधी आहे,” असे ते मानतात. प्रत्येक चूक नोंदवून त्यातून सुधारणा करणे, हेच यशाचे गमक असल्याचे ते सांगतात. तसेच केवळ अभ्यासावरच नव्हे, तर सर्वांगीण विकासावरही लक्ष द्या, आत्मविश्वास वाढवा आणि मानसिक संतुलन ठेवा, असा सल्ला ते देतात. भविष्य देसाई यांची ही यशोगाथा हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. स्पष्ट ध्येय, कठोर परिश्रम, कुटुंबाचा पाठिंबा आणि स्वतःवर असलेला विश्वास या चार गोष्टी एकत्र आल्या, तर कोणतेही स्वप्न अशक्य राहत नाही, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.






