फोटो सौजन्य - Social Media
अभ्यास करताना अनेक विद्यार्थ्यांना लक्ष न लागणे, कंटाळा येणे किंवा वेळेचे योग्य नियोजन न होणे अशा अडचणी येतात. मात्र काही सोप्या सवयी अंगीकारल्या, तर अभ्यास अधिक परिणामकारक आणि आनंददायी होऊ शकतो. चला तर मग, अभ्यासासाठी उपयुक्त अशा काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घेऊया.
अभ्यास प्रभावी होण्यासाठी योग्य वातावरण असणे अत्यंत आवश्यक आहे. अभ्यासासाठी घरात एक ठराविक जागा निवडा. त्या ठिकाणी बसण्यासाठी टेबल-खुर्ची असावी आणि पुस्तके, वही ठेवण्यासाठी पुरेशी जागा असावी. शक्य असल्यास अभ्यासाच्या खोलीच्या बाहेर “Do Not Disturb” असा फलक लावा, जेणेकरून घरातील इतर सदस्य तुम्हाला वारंवार व्यत्यय आणणार नाहीत. स्वच्छ, शांत आणि प्रकाशमान जागा अभ्यासासाठी नेहमीच उपयुक्त ठरते. अभ्यासाला योग्य दिशा देण्यासाठी नियोजन आवश्यक आहे. रोजचा अभ्यासाचा वेळापत्रक तयार करा. प्रत्येक विषयाला ठराविक वेळ द्या आणि त्या वेळेत तो विषय पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. अभ्यासाला दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवा. सुरुवातीला फार मोठी उद्दिष्टे ठेवू नका, तर हळूहळू अभ्यासाचा वेळ वाढवा. एकावेळी ४५ मिनिटांपेक्षा जास्त सलग अभ्यास करू नका. मध्ये थोडा ब्रेक घेणे आवश्यक आहे.
अभ्यासाला बसण्यापूर्वी मोबाइल फोन, सोशल मीडिया, टीव्ही, गेम्स अशा लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी स्वतःपासून दूर ठेवा. एकदा अभ्यासात व्यत्यय आला की पुन्हा एकाग्रता मिळवणे कठीण जाते. मोबाइल सायलेंट मोडवर ठेवा किंवा शक्य असल्यास दुसऱ्या खोलीत ठेवा. त्यामुळे तुमचा वेळ वाया जाण्यापासून वाचेल आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित होईल.
दीर्घकाळ अभ्यास करण्यासाठी स्वयंशिस्त हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. मन भरकटू लागले की स्वतःलाच समज देऊन पुन्हा अभ्यासाकडे वळवा. ठरवलेले वेळापत्रक पाळण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला कठीण वाटेल, पण सवय लागल्यानंतर अभ्यास आपोआप होऊ लागतो. स्वतःशी प्रामाणिक राहणे आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
सतत ब्रेक न घेता अभ्यास केल्यास कंटाळा येतो आणि अभ्यासाचे ओझे वाटू लागते. त्यामुळे दर ४५ ते ६० मिनिटांनंतर ५ ते १० मिनिटांचा ब्रेक घ्या. या वेळेत हलका व्यायाम, चालणे, पाणी पिणे किंवा डोळ्यांना आराम देणारी एखादी कृती करा. यामुळे मेंदू ताजातवाना राहतो आणि केलेला अभ्यास दीर्घकाळ लक्षात राहतो. प्रत्येक विद्यार्थ्याची अभ्यास करण्याची वेळ वेगवेगळी असते. काही जण सकाळी लवकर उठून उत्तम अभ्यास करू शकतात, तर काहींना रात्री शांततेत अभ्यास करणे सोयीचे वाटते. तुम्ही कोणत्या वेळी अधिक फ्रेश आणि एकाग्र असता हे ओळखा. तीच तुमची अभ्यासाची योग्य वेळ आहे. त्या वेळेत केलेला थोडासाही अभ्यास जास्त परिणामकारक ठरतो. या सोप्या पण महत्त्वाच्या सवयी अंगीकारल्यास अभ्यासातील अडचणी कमी होतील आणि यशाचा मार्ग अधिक सुकर होईल.






