
लिपीक, प्रयोगशाळा सहाय्यकांची 400 पदे भरण्याची शक्यता; अनुदानित शाळांतील भरतीला हिरवा कंदील
नागपूर : अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा दीर्घकाळापासून सुरू असलेला प्रतीक्षा काळ आता संपण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने कनिष्ठ लिपीक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहायक या तीन संवर्गातील ८० टक्के रिक्त पदांवर भरतीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे राज्यात सुमारे २३ हजार पदांवरील भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्ह्यातील ८१९ अनुदानित शाळांमध्ये लिपीक आणि प्रयोगशाळा सहाय्यकांची सुमारे ४०० पदे भरण्याची शक्यता आहे. शालेय शिक्षण विभागाने ११ ऑगस्टला शासन निर्णय जारी करून भरतीसाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. राज्यात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सुमारे ३० हजार मंजूर पदे आहेत. यामध्ये कनिष्ठ लिपिकांची सुमारे २५ हजार पदे असून, ८० टक्क्यांच्या नियमानुसार सुमारे १८४०० पदे भरतीच्या कक्षेत येतील. प्रयोगशाळा सहायकांची सुमारे ६५०० मंजूर पदे असून, त्यापैकी ५ हजारांहून अधिक पदे भरता येणार आहेत.
दरम्यान, दोन्ही संवर्गातील मिळून सुमारे २३ हजार पदांवरील भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. पूर्णवेळ ग्रंथपाल संवर्गातील रिक्त पदांचाही ८० टक्के भरतीच्या निर्णयात समावेश आहे. मात्र, कनिष्ठ महाविद्यालयांशी संबंधित शाळा तसेच शाळा-महाविद्यालयांच्या संचमान्यतेचा प्रश्न अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही.
संचमान्यतेमुळे रखडली होती भरती
संचमान्यता प्रक्रिया पूर्ण न झाल्याने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी २८ मे २०२५ रोजी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीवर स्थगिती दिली होती. आता स्थगिती हटवली आहे. नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार संचमान्यता आणि रोस्टरची प्रक्रिया पूर्ण करून भरती पुढे नेता येणार आहे.
राज्यात 23 हजार शिक्षकेतर पदे भरली जाणार
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, कनिष्ठ महाविद्यालयांशी संबंधित शाळा महाविद्यालयांच्या संचमान्यतेचा पेच कायम आहे. सरकारने हा प्रश्नही लवकर सोडवावा, जेणेकरून अधिकाधिक रिक्त पदांवर भरती होऊ शकेल.