
जनतेला पाण्याची चिंता, अहमदपूर तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर; अनेक तलाव कोरडे
अहमदपूर : अहमदपूर तालुक्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून, पावसाअभावी खरीप पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. दुसरीकडे तलावांमधील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत चालल्याने अनेक तलाव कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनत चालला असून, तालुक्यावर दुष्काळाची छाया अधिक गडद होताना दिसत आहे. यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचा अर्धा महिना उलटला तरी दमदार पाऊस झालेला नाही.
दिवसभर ढगाळ वातावरण आणि त्यानंतर कडक ऊन, असा अनुभव शेतकऱ्यांना येत आहे. त्यामुळे नदी, नाले, तलाव आणि ओढ्यांमध्ये अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. मागील वर्षीचा तलावांमधील पाणीसाठाही आता झपाट्याने कमी होत आहे. अहमदपूर तालुक्यात खरीप हंगामासाठी एकूण ७१ हजार ४९९ हेक्टर पेरणी क्षेत्र असून, ऊस वगळता ६५ हजार ६३७ हेक्टर क्षेत्रावर पिकांची पेरणी करण्यात आली आहे. यामध्ये तृणधान्य पिकांमध्ये ज्वारी, मका व इतर पिके; कडधान्यांमध्ये तूर, मूग, उडीद व इतर पिके; तसेच गळीत धान्यांमध्ये भुईमूग, तीळ, करडई, सोयाबीन आदी पिकांचा समावेश आहे.
पिकांनी टाकल्या माना
तालुक्यात ९४.७ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. मात्र, पावसाने सातत्याने ओढ दिल्याने पिकांची अवस्था चिंताजनक बनली आहे. अधूनमधून झालेल्या लहरी पावसाच्या सरींवर पिके तग धरून आहेत. काही ठिकाणी पिकांनी माना खाली टाकल्या असून, सोयाबीन करपू लागल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान, यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने नदी, नाले, ओढे तसेच तलावांमध्ये अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही.
हे सुद्धा वाचा : लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात; कारवाईनंतर काही तासांतच दिली उपनगराध्यक्षांना धमकी
तलावांतील पाणी घटले; पाण्याची चिंता वाढली
रेणापूर तालुक्यातील व्हटी मध्यम प्रकल्प तसेच अहमदपूर तालुक्यातील कोपरा साठवण तलाव, भुतेकरवाडी लघुपाटबंधारे तलाव, नागठाणा लघुपाटबंधारे तलाव, उगिलेवाडी साठवण तलाव, पाटोदा साठवण तलाव, गोताळा लघुपाटबंधारे तलाव, काळेगाव साठवण तलाव, अहमदपूर साठवण तलाव, वाकी लघुपाटबंधारे तलाव, तेलगाव लघुपाटबंधारे तलाव आणि कौडगाव साठवण तलावातील पाणीसाठा कमी झाला आहे. तलावांमधील पाणीसाठा कमी होत असल्याने शेती पिकांसह आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे. जनावरांच्या पाण्याची उपलब्धताही चिंतेचा विषय बनत आहे. त्यामुळे तालुक्यात दमदार पावसाची नितांत गरज असून, पाऊस आणखी लांबल्यास अहमदपूर तालुक्यासमोर दुष्काळाचे संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.