
संतोष पंडितवर गुन्हा, मग आमदार गायकवाडांवर का नाही? कोथरूड पोलीस ठाण्यात रोहित पवार आक्रमक
पुणे : ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता पुण्यात पोहोचला असून, बुलडाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. कोल्हापूरचे प्रकाशक प्रशांत आंबी आणि आमदार रोहित पवार यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात जाऊन याबाबत पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. “पुणे पोलिस न्याय देतात, मग आम्हालाही न्याय हवा,” असा आक्रमक पवित्रा घेत आमदार रोहित पवार, प्रशांत आंबी आणि त्यांच्या पत्नी आरती आंबी यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात तब्बल दोन तास ठिय्या दिला.
आमदार संजय गायकवाड यांनी प्रशांत आंबी यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी हा ठिय्या देण्यात आला. त्यामुळे कोथरूड पोलिस ठाण्यात काही काळ हायहोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. प्रशांत आंबी यांनी यापूर्वी कोल्हापूर पोलिसांकडे आमदार गायकवाड यांच्याविरोधात तक्रार केली आहे. गायकवाड यांनी फोनवरून आई-बहिणीवरून अश्लील शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आंबी यांनी केला आहे. संतोष पंडीतवर जसा गुन्हा दाखल झाला तसा गुन्हा गायकवाड यांच्यावर दाखल करावा, अशी मागणी अंबी यांची पत्नी आणि आईने पोलिसांकडे केली आहे.
दरम्यान याप्रकरणी सोनाली त्रिंबक कांबळे यांनी ५ सप्टेंबर रोजी कोथरूड पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला आहे. सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये गायकवाड आणि आंबी यांच्यातील संभाषण असल्याचा दावा करण्यात आला आहे. या संभाषणात अश्लील शिवीगाळ करण्यासह घरात घुसून मारण्याची, जीभ कापण्याची आणि ठार करण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधीने अशा प्रकारची भाषा वापरून धमकी दिली असल्याने दखलपात्र गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली.
‘कोथरूड पोलिसांनी तत्परता दाखवावी’
कोथरूड पोलिसांनी यापूर्वी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केल्याच्या प्रकरणात संतोष पंडित यांच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करून कारवाई केली होती. त्याच धर्तीवर गायकवाड यांच्याविरोधातील तक्रारीतही पोलिसांनी तत्परतेने कारवाई करावी, अशी मागणी प्रशांत आंबी यांनी केली. आंबी कुटुंबाला न्याय मिळावा, यासाठी रोहित पवार यांनीही पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
हे सुद्धा वाचा : लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात; कारवाईनंतर काही तासांतच दिली उपनगराध्यक्षांना धमकी
गायकवाडांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल होणार नाही
प्रशांत आंबी यांच्याशी संबंधित घटनेत आधीच कारवाई झाली असून, कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिस ठाण्यात प्रकरण सुरू आहे. त्यामुळे त्याच घटनेचा दुसरा गुन्हा पुण्यात दाखल करता येणार नाही. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याची माहिती पोलिस उपायुक्त सागर कवडे यांनी दिली. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केल्याप्रकरणी संतोष पंडित यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईबाबतही कवडे यांनी स्पष्टीकरण दिले. पंडित यांची अटक कायदेशीर असून, न्यायालयानेही ती कायदेशीर ठरवली आहे. या प्रकरणाचा पाच दिवसांत सखोल तपास करण्यात आला असून, पंडित तपासात पोलिसांना सहकार्य करीत असल्याचे कवडे यांनी सांगितले.
प्रशांत आंबी संदर्भात जो प्रकार घडला त्याबाबत त्यांच्या पत्नी आरती आंबी या तक्रार देण्यासाठी आल्या होत्या. याप्रकरणी कोल्हापुर येथील राजारामपुरी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल आहे. यात न्यायालयाने तपास करण्याचे आदेश दिले असून तपास सुरू आहे. त्यामुळे कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करता येणार नसल्याची माहिती आंबी यांना देण्यात आली आहे. एकाच घटनेचा दोन ठिकाणी तपास होत नाही. त्यामुळे त्यांना कळविले आहे. -सागर कवडे, पोलिस उपायुक्त परिमंडळ, तीन