फोटो सौजन्य - Social Media
‘१ मे’ ही फक्त तारीख नसून अवघ्या मराठी मुल्कासाठी फार महत्वाचा दिवस आहे. याच दिवशी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. मराठी मनांना त्यांच्या हक्काचे राज्य मिळाले. मुंबईसारख्या महानगराला मिळवण्यासाठी दिलेल्या बलिदानाला खऱ्या अर्थाने आदरांजली वाहिली गेली ती आजच! १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. हा दिवस राज्यासाठी सगळ्यात महत्वाचा दिवस आहे. संपूर्ण राज्यभरात हा दिवस ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून साजरा केला जातो. राज्य पुनर्रचना कायदा (१९५६) अंतर्गत, भाषांच्या आधारे राज्यांची पुनर्र्चना गेली. Bombay State म्हणून ओळखला जाणाऱ्या राज्याची दोन भागात निर्मिती करण्यात आली एक म्हणजे गुजराती भाषिकांसाठी गुजरात तर मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र! पण या विभागणी वेळी पडलेला प्रश्न म्हणजे, मुंबई कुणाची?
मुंबई तेव्हाही महानगर होते आणि देशातील महत्वाचे शहर होते. मुंबईत मराठी, गुजराती, कच्छी तसेच कोकणी भाषिक लोकं मोठ्या प्रमाणावर राहत होते. त्याकाळी संयुक्त महाराष्ट्र समितीने मुंबईसह मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र राज्याची मागणी केली. तसेच गुजराती भाषिकांसाठी गुजरात आणि मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र अशा मागणीने जोर धरला. मुंबई महाराष्ट्रात आणण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीने अटोनात प्रयत्न केले. २५ एप्रिल १९६० रोजी संसदेत बॉम्बे पुनर्रचना कायदा मंजूर झाला.
मुळात, २१ नोव्हेंबर १९५६ रोजी फ्लोरा फाउंटन येथे मोर्चा व घोषणाबाजी करण्यात आली. मुंबई महाराष्ट्रात आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबई महाराष्ट्राला न देण्याचा निर्णय घेतला होता. मोर्चाला रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला, पण आंदोलक शांत झाले नाहीत. अखेरीस मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या आदेशाने पोलिसांनी गोळीबार केला, ज्यात अनेक आंदोलक शहीद झाले आणि जखमी झाले. यामध्ये १०६ आंदोलक शहीद झाले. मोठ्या संघर्षाने मुंबई महाराष्ट्रात आली आणि मराठी माणसाला त्याच्या हक्काचे राज्य मिळाले. तरीही अजून मराठी माणूस येथे आपल्या हक्कांसाठी लढतोय, आपल्या भाषेसाठी लढतोय, हे चित्र अतिशय दुर्दैवी आहे.