मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा असून तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. याच गौरवाच्या निमित्ताने आणि ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधून २७ फेब्रुवारी रोजी “मराठी भाषा गौरव दिन” साजरा केला जातो. विवा महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळ व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा दिवस दिमाखात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती याविषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान वाङ्मय मंडळाच्या कार्यवाहक प्रा. कविता पाटील यांनी दिले. मराठी भाषेचे महत्त्व, भाषेमुळे व्यक्तीवर होणारे संस्कार, मातृभाषा आणि माध्यम संस्कृती, भाषा व माध्यमांचे संबंध या महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी सखोल विवेचन केले. महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. नीलिमा भागवत आणि प्राध्यापक महेश जगताप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले.
मराठी वाङ्मय मंडळातर्फे आयोजित निबंध स्पर्धेचा निकाल या सोहळ्यात जाहीर करण्यात आला. विजेत्या विद्यार्थ्यांना प्राध्यापकांच्या हस्ते प्रमाणपत्रे आणि पदक देऊन सन्मानित करण्यात आले. ग्रंथालय विभागाच्या ग्रंथपाल डॉ. नागरत्ना पलोटी यांनी आपल्या मनोगतातून स्थानिक भाषेचे महत्त्व अधोरेखित केले.
ग्रंथालय विभागातर्फे दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी स्पर्धांतील विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच, ग्रंथालय विभाग आणि विद्यार्थ्यांना जोडणाऱ्या *Knowledge Bees Committee* या समितीच्या विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाच्या विविध उपक्रमांमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना विशेष सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. नीलिमा भागवत, मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा. रश्मी सावंत, इतिहास विभाग प्रमुख प्रा. जान्हवी नाईक, एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपा दळवी, डॉ. हर्षवर्धिनी बोरवणकर तसेच अनेक प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ. नागरत्ना पलोटी, वाङ्मय मंडळाच्या कार्यवाहक कविता पाटील, समिती सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वि. श. अडीगल, उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे, उपप्राचार्या डॉ. दीपा वर्मा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अंजली परांजपे यांनी केले, तर समारोप त्यांच्या सुमधुर *पसायदानाने* झाला.