
SBI Clerk Recruitment 2026: SBI मध्ये नोकरीची मोठी संधी!
देशातील मोठ्या सरकारी बँकेत नोकरी मिळवण्याची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय स्टेट बँक (SBI) ने ज्युनिअर असोसिएट म्हणजेच क्लर्क पदासाठी भरती जाहीर केली आहे. यंदाच्या भरतीत एकूण 1538 पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे बँकेत नोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही संधी महत्त्वाची मानली जात आहे.
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 7 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांना 27 ऑगस्ट 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे. मात्र अर्ज करताना एक महत्त्वाची अट लक्षात घ्यावी लागेल. उमेदवाराला एकाच राज्यासाठी किंवा केंद्रशासित प्रदेशासाठी अर्ज करता येणार आहे. त्यासोबत संबंधित राज्यातील स्थानिक भाषा येणंही आवश्यक आहे.
SBI क्लर्क पदासाठी उमेदवारांची निवड टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. सुरुवातीला प्रीलिम्स परीक्षा घेतली जाईल. त्यात चांगली कामगिरी करणाऱ्या उमेदवारांना पुढील टप्प्यात म्हणजेच मुख्य परीक्षेला बसण्याची संधी मिळेल. SBI Clerk Recruitment 2026:
मुख्य परीक्षा पार केल्यानंतर स्थानिक भाषेची चाचणी घेतली जाऊ शकते. म्हणजेच केवळ लेखी परीक्षेत चांगले गुण मिळवणे पुरेसे नाही. ज्या राज्यासाठी अर्ज केला आहे, त्या भागातील भाषा समजणेही महत्त्वाचे ठरणार आहे. प्रीलिम्स परीक्षा सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मुख्य परीक्षा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये होऊ शकते.
पहिल्या परीक्षेसाठी एकूण 100 गुण असतील. पेपर सोडवण्यासाठी एक तासाचा वेळ दिला जाईल. प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे असतील आणि परीक्षा तीन भागांत घेतली जाणार आहे.
या परीक्षेत चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंगही आहे. एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकल्यास त्या प्रश्नाला मिळणाऱ्या गुणांपैकी एक चतुर्थांश गुण वजा केले जातील. त्यामुळे प्रश्न सोडवताना घाई न करता काळजीपूर्वक उत्तर देणं महत्त्वाचं आहे. प्रीलिम्समध्ये स्वतंत्र विभागासाठी किंवा संपूर्ण परीक्षेसाठी ठरावीक पात्रता गुणांची अट ठेवण्यात आलेली नाही. मात्र मुख्य परीक्षेत बँकेने ठरवलेल्या किमान गुणांपर्यंत पोहोचणं आवश्यक राहणार आहे.
SBI क्लर्क भरतीमध्ये स्थानिक भाषेला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. ज्या राज्यासाठी उमेदवार अर्ज करेल, त्या राज्याची संबंधित भाषा त्याला येणं अपेक्षित आहे. जर उमेदवाराने दहावी किंवा बारावीच्या शिक्षणादरम्यान संबंधित स्थानिक भाषा विषय म्हणून घेतली असेल आणि त्याचा उल्लेख गुणपत्रिकेत असेल, तर अशा उमेदवाराला भाषा चाचणीपासून सूट मिळू शकते.
पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीची गुणवत्ता यादी जाहीर; मुलाखतीशिवाय 19 हजार 754 पदांसाठी प्रक्रिया
मात्र शाळेत संबंधित भाषा शिकलेली नसेल, तर निवड प्रक्रियेत पुढे गेल्यानंतर Local Language Proficiency Test (LLPT) द्यावी लागू शकते. या चाचणीत भाषा वाचता, लिहिता, बोलता आणि समजता येते का, हे पाहिलं जाईल.
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 1 एप्रिल 2026 रोजी किमान 20 आणि कमाल 28 वर्षे असणं आवश्यक आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार कमाल वयोमर्यादेत सवलत मिळणार आहे.
अर्ज भरताना आणखी एक गोष्ट विसरू नका. उमेदवाराचा मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी सक्रिय असणं गरजेचं आहे. भरतीशी संबंधित परीक्षा, प्रवेशपत्र किंवा इतर महत्त्वाच्या सूचना याच माध्यमातून मिळू शकतात.
त्यामुळे SBI मध्ये क्लर्क पदासाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता अर्ज प्रक्रिया पूर्ण करणं योग्य ठरेल. 1538 जागांची ही भरती बँकिंग क्षेत्रात प्रवेश करण्याची चांगली संधी ठरू शकते; मात्र अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरातीत दिलेली पात्रता आणि सर्व नियम काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे.