Fresher First Day Success: पहिल्याच दिवशी फ्रेशरचा कमाल! ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)
नोकरीचा पहिला दिवस म्हटला की मनात अनेक प्रश्न असतात. नवीन ऑफिस, अनोळखी लोक, वेगळे काम आणि त्यात आपण कसे काम करतो याची उत्सुकता. विशेषतः फ्रेशरसाठी हा अनुभव आणखी वेगळा असतो. सुरुवातीला जास्त बोलायचे नाही, वरिष्ठ सांगतील तेच करायचे आणि चूक होऊ नये याची काळजी घ्यायची, अशीच अनेकांची मानसिकता असते. पण एका तरुणाने नोकरीच्या पहिल्याच दिवशी याच्या अगदी उलट केले. त्याने आपले काम शांतपणे केले आणि वरिष्ठांकडून तयार झालेल्या अहवालातील मोठी चूक शोधून काढली. त्याच्या एका निरीक्षणामुळे कंपनीचे लाखो रुपये वाचले.
ही घटना एका प्रसिद्ध बिझनेस स्कूलमधून शिक्षण घेतलेल्या तरुणाची आहे. शिक्षण पूर्ण होण्याआधीच त्याला एका कंपनीत काम करण्याची संधी मिळाली होती. ऑफिसमध्ये दाखल झाल्यानंतर त्याला लगेच मोठी जबाबदारी देण्यात आली नाही. कंपनीतील ग्राहकांची खाती आणि त्यांच्याशी संबंधित काम समजून घेण्याचे काम त्याच्याकडे सोपवण्यात आले.
याच दरम्यान कंपनीचे मालक अभिषेक अग्रवाल एका महत्त्वाच्या अहवालावर काम करत होते. अहवाल तयार झाल्यानंतर त्यांनी तो पुन्हा तपासला आणि ग्राहकाला पाठवण्याची तयारी केली. ई-मेलमध्ये त्या नव्या कर्मचाऱ्यालाही कॉपीमध्ये ठेवण्यात आले. Fresher First Day Success:
अहवाल पाहताना त्या तरुणाचे लक्ष एका आकड्याकडे गेले. त्याला काहीतरी चुकीचे असल्याचे जाणवले. त्याने वेळ न घालवता थेट अग्रवाल यांच्याकडे जाऊन ही बाब सांगितली. अग्रवाल यांनी अहवाल आधीच दोन वेळा तपासला होता. त्यामुळे सुरुवातीला त्यांना तरुणाचे म्हणणे पटले नाही. पण तरुणाने सांगितलेल्या पानावर पुन्हा नजर टाकल्यावर परिस्थिती स्पष्ट झाली. गणितात खरंच चूक झाली होती.
ही साधीसुधी चूक नव्हती. अहवाल ग्राहकाकडे गेला असता कंपनीला सुमारे 30 लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागू शकले असते. त्याचबरोबर या चुकीमुळे पुढे कायदेशीर अडचणीही निर्माण होण्याची शक्यता होती.
चूक लक्षात येताच कंपनीने अहवाल पुन्हा तयार केला. ग्राहकाला परिस्थिती स्पष्ट करून दुरुस्त केलेला अहवाल पाठवण्यात आला. कंपनीने आपली चूक लपवण्याऐवजी ती मान्य केली. या प्रामाणिकपणाचा ग्राहकावर चांगला परिणाम झाला. उलट त्याने पुढील कामासाठी कंपनीसोबतचा करार कायम ठेवला आणि पुन्हा याच टीमसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
या सगळ्या प्रसंगात आणखी एक गोष्ट लक्ष वेधून घेणारी होती. या तरुणाला याआधी एका इंटर्नशिपमध्ये असाच अनुभव आला होता. त्याने तिथेही एका कामातील चूक वरिष्ठांच्या लक्षात आणून दिली होती. मात्र त्याचा स्पष्टपणे प्रश्न विचारण्याचा स्वभाव तिथल्या व्यवस्थापनाला आवडला नाही आणि त्याला नोकरी सोडावी लागली होती.
ही गोष्ट सांगताना तरुण भावूक झाला. त्यावेळी अग्रवाल यांनी त्याला दिलेला सल्ला त्याच्यासाठी महत्त्वाचा ठरला. त्यांचा संदेश स्पष्ट होता—हुशार आणि प्रश्न विचारणाऱ्या लोकांना गप्प बसवण्याऐवजी त्यांना पुढे जाण्याची संधी दिली पाहिजे. नंतर अग्रवाल यांनी हा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. त्यांच्या मते, नव्याने कामाला लागलेल्या तरुणांना प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवणाऱ्या व्यवस्थेपेक्षा स्वतःचे मत मांडण्याची संधी मिळणे अधिक महत्त्वाचे आहे.
या घटनेतून एक साधा पण महत्त्वाचा धडा मिळतो. अनुभव कमी असला तरी निरीक्षण करण्याची नजर आणि चुकीवर आवाज उठवण्याचे धाडस असेल, तर एखादा फ्रेशरही मोठे काम करू शकतो. ऑफिसमध्ये किती वर्षे काम केले यापेक्षा योग्य वेळी योग्य गोष्ट सांगण्याचे धैर्य कधी कधी जास्त महत्त्वाचे ठरते.






