
doctor..
MBBS Course Duration and Year-Wise Syllabus: पांढरा कोट, गळ्यात स्टेथोस्कोप आणि लोकांचे प्राण वाचवण्याची जिद्द. दरवर्षी लाखो तरुण डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहतात. परंतु, या स्वप्नाचा रस्ता कष्टांच्या आणि मेहनतीच्या वाटेने जातो. नीट परीक्षा पास करून वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर खरी ट्रेनिंग सुरू होते. एमबीबीएसचा अभ्यास नेमका किती वर्षांचा असतो आणि यादरम्यान काय शिकवले जाते, हा प्रश्न अनेकदा लोकांच्या मनात असतो.
भारतात एमबीबीएसचा संपूर्ण कोर्स एकूण ५.५ वर्षे कालावधीचा असतो. त्याचे दोन भागांत विभाजन केले जाते त्यामध्ये ४.५ वर्षांचे पुस्तकीय आणि क्लिनिकल शिक्षण आणि १ वर्षाची सक्तीची रोटेटिंग इंटर्नशिप याचा समावेश होतो. या साडेपाच वर्षांमध्ये वैद्यकीय विद्यार्थ्यांना मानवी शरीराची प्रत्येक नस, आजार आणि त्यावर उपचार करण्याबाबत टप्प्याटप्प्याने तज्ज्ञ बनवले जाते. तुम्ही जर मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याची तयारी करत असाल, तर एमबीबीएसच्या प्रत्येक वर्षाचा अभ्यासक्रम कसा असतो, हे जाणून घेणे गरजेचे आहे.
डॉक्टर बनण्यासाठी एमबीबीएसचा अभ्यास करणे अनिवार्य आहे. एमबीबीएसचा अभ्यासक्रम खूप विस्तृत आहे. मूलभूत ज्ञान मिळवल्यानंतर तुम्ही स्पेशलायझेशनची तयारी सुरू करू शकता.
पहिले वर्ष: मानवी शरीराची रचना
एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात वैद्यकीय विद्यार्थ्यांना मानवी शरीराची मूळ माहिती दिली जाते. यामध्ये प्रामुख्याने ३ विषय असतात.
ॲनाटॉमी : यामध्ये मृतदेहाच्या साहाय्याने हाडे, स्नायू आणि अवयवांची रचना सखोलपणे शिकवली जाते.
फिजिओलॉजी : यामध्ये शरीराचे अवयव कसे कार्य करतात, हे शिकवले जाते.
बायोकेमिस्ट्री : यामध्ये शरीराच्या अंतर्गत होणाऱ्या रासायनिक प्रक्रिया आणि रक्त तपासणीबाबत शिकवले जाते.
दुसरे वर्ष: आजार आणि औषधे
शरीराची रचना समजून घेतल्यानंतर, दुसऱ्या वर्षात आजार आणि त्यांच्या उपचारांची सुरुवात होते:
पॅथॉलॉजी : आजार का आणि कसे होतात, त्यांचा शरीरावर काय परिणाम होतो.
फार्माकोलॉजी : कोणती औषधे कोणत्या आजारात कशी काम करतात आणि त्याचे काय दुष्परिणाम होतात.
मायक्रोबायोलॉजी : बॅक्टेरिया, विषाणू आणि फंगसमुळे होणाऱ्या संसर्गाचा अभ्यास.
फॉरेन्सिक मेडिसिन : पोस्टमॉर्टम आणि वैद्यकीय-कायदेशीर प्रकरणांची माहिती.
तिसरे वर्ष – भाग १: समुदाय आणि कान-नाक-घसा
तिसऱ्या वर्षात वैद्यकीय विद्यार्थ्यांना सामान्य आजार आणि काही विशेष अवयवांबद्दल शिकवले जाते:
कम्युनिटी मेडिसिन : शासकीय आरोग्य योजना, साथीचे आजार आणि ग्रामीण भागातील आरोग्य समस्या.
ईएनटी : कान, नाक आणि घशाचे आजार.
ऑप्थॅल्मोलॉजी : डोळ्यांचे आजार आणि त्यांची तपासणी.
तिसरे वर्ष – भाग २: सर्जरी आणि उपचारांची मास्टर क्लास
जनरल मेडिसिन: गंभीर आजारांवर शस्त्रक्रियेशिवाय औषधोपचार करणे.
जनरल सर्जरी: ऑपरेशन थिएटरमध्ये शस्त्रक्रिया करणे आणि टाके घालायला शिकणे.
गायनेकोलॉजी : महिलांचे आरोग्य, बाळंतपण आणि गर्भावस्थेची काळजी.
पिडियाट्रिक्स : बालकांचे आजार आणि त्यांच्यावर उपचार.
४.५ वर्षांची थिअरी आणि प्रॅक्टिकल परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर वैद्यकीय विद्यार्थ्यांना ‘डॉक्टर’ ही पदवी मिळते, परंतु प्रॅक्टिसचा परवाना इंटर्नशिप नंतरच मिळतो. या १ वर्षात विद्यार्थ्यांना इमर्जन्सी वॉर्ड, आयसीयू (ICU), लेबर रूम आणि सर्जरी विभागात प्रत्यक्ष रुग्णांवर उपचार करावे लागतात. ही इंटर्नशिप रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली जाते.