फोटो सौजन्य - Social Media
नागपूर जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळांमध्ये तब्बल 580 शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची बनावट नियुक्ती झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र शिक्षक परिषदेने हा घोटाळा उघडकीस आणला असून या प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी 2016 मध्येच सेवानिवृत्त झालेल्या आणि त्यानंतर मृत्यू पावलेल्या शिक्षण अधिकाऱ्याच्या बनावट सह्यांचा वापर करण्यात आल्याचं उघड झालं आहे.
या प्रकरणामुळे शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे. बनावट शिक्षकांना दरमहा पगार दिला जात असल्याने शासनाचा मोठा आर्थिक तोटा झाला आहे. एकेका बनावट नियुक्तीसाठी 20 ते 35 लाख रुपये इतकी मोठी रक्कम लाच म्हणून दिल्याचंही तपासात समोर आलं आहे. मृत अधिकाऱ्याच्या सह्यांचा वापर करून 2016 नंतर अनेक बोगस भरती करण्यात आल्या, ही संख्या १०० पेक्षा अधिक आहे.
या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार निलेश मेश्राम असल्याचं समोर आलं आहे. तो शिक्षण विभागात अधीक्षक पदावर कार्यरत होता. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्या मोबाईलमधून एक ऑडिओ क्लिप मिळाली आहे. या क्लिपमध्ये तो बनावट भरतीसाठी कागदपत्रांची चर्चा करताना ऐकायला मिळतो. सध्या पोलिस त्याची संपत्तीही तपासत आहेत आणि त्याच्यावर काळ्या पैशाची चौकशी होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिसांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत की दोषींना कोणतीही सूट दिली जाणार नाही. यातील बनावट शिक्षकांकडून पगाराची वसुली केली जाणार असून त्यांच्या नियुक्त्या तात्काळ रद्द केल्या जातील. या प्रकरणात जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागातील इतर अधिकाऱ्यांचीही संलिप्तता असल्याचा संशय असून चौकशीच्या दरम्यान आणखी मोठा रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. बनावट शिक्षक भरतीप्रकरणी दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.