
फोटो सौजन्य - Social Media
मूर्तिजापूर शहर पोलिस स्टेशनच्या वतीने ‘राज्य गणेशमहोत्सव’ अंतर्गत आयोजित निबंध व चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना करिअर घडविताना एकाग्रता अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. पोलिस दल केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्यापुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांमध्ये कलागुण, सर्जनशीलता आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवित असल्याचे त्यांनी सांगितले. निबंध व चित्रकला स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देत त्यांना देशभक्ती, समाजसेवा आणि सकारात्मक विचारांची दिशा देण्याचा प्रयत्न केला जातो, असे त्यांनी नमूद केले. आजच्या काळात सोशल मीडियाकडे मुलांचा वाढता ओढा चिंताजनक असून विद्यार्थ्यांनी त्यावर अनावश्यक वेळ न घालवता अभ्यास, ध्येयपूर्ती आणि शासन तसेच शाळा स्तरावर राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कोणतेही क्षेत्र निवडले तरी स्पष्ट ध्येय, सातत्यपूर्ण मेहनत आणि शिस्त या तीन गोष्टींवर भर दिल्यास यश निश्चित मिळते, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा सल्ला दिला. ‘राज्य गणेशमहोत्सव’ अंतर्गत अकोला जिल्हा पोलिस दलातर्फे मूर्तिजापूर शहर पोलिस स्टेशनच्या वतीने शहरातील भारतीय ज्ञानपीठ विद्यालय येथे चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शहरातील ९ ते १० शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
प्राथमिक व माध्यमिक विभागासाठी स्वतंत्र गट तयार करून पाचवी ते आठवी आणि नववी ते बारावी या दोन गटांमध्ये निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी सामाजिक विषय, देशभक्ती, पर्यावरण संवर्धन आणि गणेशोत्सवाशी संबंधित विषयांवर आपली कला आणि विचार प्रभावीपणे मांडले. स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी वैशाली मुळे आणि मूर्तिजापूर शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव यांच्या हस्ते प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजन व यशस्वी आयोजनासाठी प्रा. अविनाश बेलाडकर, प्रा. दिपक जोशी, प्रतीक कुन्डेकर आणि शाम वाळसकर यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या स्पर्धेत भारतीय ज्ञानपीठ विद्यालय, इंटरनॅशनल स्कूल ऑफ इंटिग्रेटिव्ह एज्युकेशन, सेंट अॅन्स स्कूल, श्री व्यंकटेश बालाजी हायस्कूल, अकॅडमिक हाइट्स पब्लिक स्कूल, मूर्तिजापूर हायस्कूल, परमानंद मालानी विद्यालय, मूर्तिजापूर पब्लिक स्कूल, गाडगे महाराज विद्यालय, सेंट झेव्हियर्स स्कूल, सरला राम काकानी विद्यालय आदी शाळांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना चालना मिळाली असून समाजाशी नाळ जोडण्याची प्रेरणाही मिळाल्याची भावना यावेळी उपस्थित पालक व शिक्षकांनी व्यक्त केली.