फोटो सौजन्य - Social Media
शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त, शारीरिक तंदुरुस्ती, आरोग्याबाबत जागरूकता आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे शिक्षण संचालनालयाने आपल्या आदेशात नमूद केले आहे. या उपक्रमासाठी शिक्षण संचालनालयाकडून १४ मिनिटांचा देशभक्तीपर गीतांचा विशेष व्हिडीओ तयार करण्यात आला असून, त्याच व्हिडीओच्या तालावर आणि सूचनांनुसार विद्यार्थ्यांना शारीरिक कवायती कराव्या लागणार आहेत. विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना एका मोठ्या, सामायिक मैदानावर एकत्र करून हा उपक्रम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या नव्या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शाळांना आधीपासूनच तयारी करावी लागणार असून, दर शुक्रवार आणि शनिवार शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून कवायतींचा सराव करून घ्यावा, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. यासोबतच गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षण उपनिरीक्षक आणि केंद्रप्रमुख यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील किती शाळा सहभागी होणार आहेत, किती विद्यार्थी एकत्र येणार आहेत, कोणते मैदान निवडले जाणार आहे, त्या मैदानाची क्षमता किती आहे, तसेच पार्किंग, वाहतूक आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक सोयी उपलब्ध आहेत की नाही, याची सखोल पडताळणी करावी लागणार आहे.
या सर्व बाबी लक्षात घेऊन २६ जानेवारीच्या एकत्रित कवायतींचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, २६ जानेवारीपासून पुढील प्रत्येक वर्षी याच पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येणार असल्याचेही शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे. मात्र, या उपक्रमात विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारची सक्ती केली जाणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. ‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या या उपक्रमात राज्यातील एक लाखांहून अधिक शाळा, सात लाखांपेक्षा जास्त शिक्षक आणि दोन कोटींपेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होणार असून, हा उपक्रम राज्यातील शालेय शिक्षणाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा आणि व्यापक उपक्रम ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.






