
फोटो सौजन्य - Social Media
सोनाजी गाढवे, नवराष्ट्र पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इ.१० वी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२६ चा निकाल ९२.०९ टक्के लागला आहे. मागील वर्षी निकालाची टक्केवारी ९४.१० होती. त्यामुळे यंदाच्या निकालात २.०१ टक्क्यांनी घट झाली आहे. राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतून एकूण १५ लाख ५५ हजार ०२६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ४२ हजार ४७२ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले. त्यांपैकी १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून नियमित विद्यार्थ्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.०९ इतकी आहे.
खाजगी विद्यार्थ्यांमध्ये एकूण २९ हजार ५०६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २८ हजार ८२५ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले आणि २२ हजार ००३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या गटाचा निकाल ७६.३३ टक्के लागला आहे. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये २९ हजार ५१८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यांपैकी २८ हजार ८६७ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यामधील ९ हजार ७५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या गटाचा निकाल ३३.७९ टक्के लागला आहे. नियमित, खाजगी आणि पुनर्परीक्षार्थी मिळून राज्यभरातून एकूण १६ लाख १४ हजार ०५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १६ लाख ०० हजार १६४ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले. त्यामधील १४ लाख ५२ हजार २४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकालाची टक्केवारी ९०.७५ इतकी आहे.
दहावी निकालात कोकण अव्वल; मुलींची पुन्हा बाजी, विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईनची सुविधा
फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत राज्यातील ६४ विषयांपैकी २० विषयांचा निकाल शंभर टक्के लागला असून, २३ हजार ६९८ शाळांपैकी तब्बल ६ हजार ६१२ शाळांनी शंभर टक्के निकालाची नोंद केली आहे. विभागीय निकालात कोकण विभागाने ९७.६२ टक्क्यांसह अव्वल स्थान पटकावले, तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी ८८.४१ टक्के राहिला. यंदाही मुलींनी सरस कामगिरी करत ९४.९६ टक्के निकाल मिळवला असून मुलांचा निकाल ८९.५६ टक्के नोंदविण्यात आला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचाही निकाल ९१.२२ टक्के लागला आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांना मानसिक आधार व समुपदेशनासाठी ‘टेलीमानस’ हेल्पलाईन १४४१६ आणि ‘मनोदर्शन’ हेल्पलाईन ८४४८४४०६३२ सुरू करण्यात आली असून, राज्यभरात ३१५ समुपदेशकांची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या ताणतणाव व करिअर मार्गदर्शनासाठी १० समुपदेशकांची नियुक्ती मंडळाकडून करण्यात आली आहे.
राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा २०२६ चा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला असून, यंदा एकूण १५ लाख ५५ हजार २६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ४२ हजार ४७२ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले आणि १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विभागीय निकालात कोकण विभागाने ९७.६२ टक्क्यांसह अव्वल स्थान पटकावले, तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल ८८.४१ टक्क्यांसह सर्वात कमी राहिला. मुंबई विभागाचा निकाल ९४.९७ टक्के, कोल्हापूरचा ९५.४७ टक्के आणि पुण्याचा ९४.२४ टक्के नोंदविण्यात आला. यंदाही मुलींनी बाजी मारत ९४.९६ टक्के निकाल मिळवला असून मुलांचा निकाल ८९.५६ टक्के राहिला आहे. मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ५.४० टक्क्यांनी अधिक आहे. दरम्यान, २० विषयांचा निकाल शंभर टक्के लागला असून ४ लाख ८२ हजार २६४ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवली आहे. मागील वर्षांच्या तुलनेत यंदाचा निकाल घसरला असून २०२४ मध्ये ९५.८१ टक्के असलेला निकाल २०२६ मध्ये ९२.०९ टक्क्यांवर आला आहे.