फोटो सौजन्य- CBSE X account
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) कडून इयत्ता 10वी आणि 12वीचा निकाल आज, 2 मे रोजी जाहीर केला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बोर्डाकडून अद्याप कोणतीही अधिकृत तारीख किंवा वेळ घोषित करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अफवांवर विश्वास न ठेवता फक्त CBSE बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट्सवरच निकालासाठी लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिकृत संकेतस्थळे म्हणजे cbse.gov.in, results.cbse.nic.in आणि cbseresults.nic.in या आहेत.
मागील वर्षी, म्हणजेच 2024 मध्ये CBSE बोर्डाचे दहावी आणि बारावीचे निकाल 13 मे रोजी जाहीर झाले होते. त्यामुळे यंदाही निकालासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते. 2 मे रोजी निकाल लागणार असल्याची अफवा सोशल मीडियावर आणि इतर माध्यमांतून पसरल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार बोर्डाकडून अद्याप उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्ण झालेले नाही. त्यामुळे निकाल 6 मेनंतर कधीही जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यंदा CBSE बोर्डाच्या परीक्षांमध्ये एकूण सुमारे 41 लाख विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये इयत्ता 10वीचे अंदाजे 24.12 लाख आणि 12वीचे सुमारे 17.88 लाख विद्यार्थी होते. परीक्षा मार्च 2025 मध्ये पार पडल्या होत्या. CBSE बोर्डाने यापूर्वी स्पष्टपणे सांगितले आहे की, विद्यार्थ्यांनी कोणत्याही गैरप्रकार किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये. निकालाबाबत अधिकृत घोषणा झाल्यानंतर त्याची माहिती वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल. निकालाची प्रतीक्षा करत असलेल्या विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या वेबसाइट्सवर वेळोवेळी भेट देत राहावे. तसेच, कोणीही सोशल मीडियावरील अप्रमाणित माहितीकडे दुर्लक्ष करावे, असा सल्लाही देण्यात आला आहे.
एकदा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर, शाळा क्रमांक आणि अॅडमिट कार्ड आयडी याच्या आधारे निकाल पाहता येईल. निकालासंदर्भातील अधिकृत घोषणेसाठी संपर्कात राहा.