
फोटो सौजन्य - Social Media
येथील झील इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय ‘कब-बुलबुल’ उत्सव मंगळवारी (दि. ३०) मोठ्या उत्साहात पार पडला. या उत्सवात तालुक्यातील विविध शाळांमधील १४० हून अधिक कब-बुलबुल विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून बालकांमधील शिस्त, सहकार्य आणि शारीरिक कौशल्यांचे प्रभावी दर्शन घडवले. या कब-बुलबुल उत्सवाचे उद्घाटन झील इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष शार्दुल मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा संघटक के. एल. पवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला झील इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका अभिलाषा बासुळे, रेखा कापुरे, काजल पवार, मोहम्मद इक्तेखार हुसेन, विठ्ठल भुसारे, ज्येष्ठ स्काऊट मास्टर गोपाल काकड, श्रीकांत देशपांडे, प्रशांत इंगळे, निलेश मिसाळ, प्रीता भोंगाडे यांच्यासह शिक्षकवर्ग व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, नेतृत्वगुण आणि शारीरिक तंदुरुस्ती वाढावी, हा उद्देश असल्याचे मान्यवरांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले. कब-बुलबुल चळवळ ही बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
उत्सवात विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजक व कौशल्याधारित स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सामूहिक लोकनृत्य, दोरीवरच्या उड्या, पोता शर्यत, बटाटा रेस, तीन टांगी शर्यत आदी स्पर्धांचा समावेश होता. या सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. खेळादरम्यान विद्यार्थ्यांचा आनंद, आत्मविश्वास आणि शिस्त पाहण्यासारखी होती.
या तालुकास्तरीय कब-बुलबुल उत्सवात किनखेड तालुक्यातील विविध शाळांनी सहभाग नोंदविला. यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पसरणी, वढवी कामठवाडा, गायवळ काजळेश्वर येथील प्राथमिक शाळा, कंकुबाई कन्या प्राथमिक शाळा, विद्यारंभ स्कूल, झील इंटरनॅशनल स्कूल, श्री समंतभद्र प्राथमिक शाळा, डॉ. अल्लामा इक्बाल उर्दू प्राथमिक शाळा, वेदांत पब्लिक स्कूल, उंबर्डा जिल्हा परिषद कन्या शाळा, काजळेश्वर जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा आदी शाळांचा समावेश होता. उत्सवाच्या समारोपप्रसंगी सर्व पात्र स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. तसेच, कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कब मास्टर निलेश मिसाळ यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा संघटक के. एल. पवार यांनी मांडली, तर उपस्थितांचे आभार ज्येष्ठ स्काऊट मास्टर गोपाल काकड यांनी मानले. संपूर्ण उत्सव अत्यंत शिस्तबद्ध आणि आनंददायी वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.