फोटो सौजन्य - Social Media
विद्यार्थिनींनी स्वतःला अबला न समजता सबल बनवावे, आत्मविश्वासाने पुढे जावे, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांनी केले. ते श्री शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय आणि बाल शिवाजी कॉन्व्हेंट, गोरेगाव खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. पंजाबराव देशमुख जयंती उत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या भाषणात पवार यांनी शिक्षण घेत असताना बालकांवर, विशेषतः मुलींवर होणाऱ्या अत्याचारांविषयी चिंता व्यक्त केली. शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी कोणते वर्तन अपेक्षित आहे, शिस्त, नैतिकता आणि आत्मसंरक्षणाचे महत्त्व यावर त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच भाऊसाहेबांची थोरवी, त्यांचे शिक्षणविषयक विचार आणि सामाजिक कार्य यांचा सविस्तर आढावा घेत विद्यार्थ्यांनी त्यांच्या आदर्शांचा अंगीकार करावा, असे सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी बहारदार स्वागत नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी नारीशक्तीवर आधारित नृत्य सादर करत महिलांच्या सामर्थ्याचा संदेश दिला. मान्यवरांनी विज्ञान प्रदर्शनातील प्रतिकृती तसेच रांगोळी स्पर्धेतील कलाकृतींचे निरीक्षण केले.
स्नेहसंमेलनांतर्गत आयोजित विविध स्पर्धांचे यावेळी बक्षीस वितरण करण्यात आले. यामध्ये खेळ स्पर्धा, वक्तृत्व, निबंध, भावगीत, रांगोळी, रंगभरण आणि विज्ञान प्रदर्शनी या स्पर्धांचा समावेश होता. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व वैज्ञानिक दृष्टिकोनाला व्यासपीठ मिळाल्याने कार्यक्रम अधिक रंगतदार झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधीर वाकोडे पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून शिव परिवाराचे विलास हरणे, छावा संघटनेचे शंकरराव वाकोडे, माजी जि. प. सदस्य संतोष वाकोडे, माजी मुख्याध्यापक जे. टी. वाकोडे, मधुकर वाकोडे, प्राचार्य हनुमंत सपकाळ, उत्सव प्रमुख वर्षा अंभोरे, शिक्षक प्रतिनिधी जया पोहरकर, सहउत्सव प्रमुख रवींद्र शिरसाट, बाल शिवाजी कॉन्व्हेंटचे समन्वयक महेंद्र चहाटे, कर्मचारी प्रतिनिधी रवींद्र चतरकर आदी उपस्थित होते.
यावेळी सर्वांच्या आग्रहाखातर रतनसिंग पवार यांनी स्वरचित ‘भाऊसाहेबांचा पाळणा’ गायनातून सादर केला. जे. टी. वाकोडे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या कविता ऐकवत प्रेरणा दिली. अध्यक्ष सुधीर वाकोडे यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक प्रगतीचा आलेख मांडला. विलास हरणे यांनी मुख्याध्यापक सपकाळ, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या कार्याचे कौतुक केले. सुधीर वाकोडे यांनी बोधकथांच्या माध्यमातून सद्वर्तनाचे महत्त्व आणि भाऊसाहेबांना अपेक्षित विद्यार्थ्यांचे गुण स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण मालवे यांनी केले, तर आभार वर्षा अंभोरे यांनी मानले. कार्यक्रमानंतर सर्व मान्यवर व विद्यार्थ्यांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. स्नेहभोजनाचे नियोजन प्रा. बेताल यांनी केले.






