व्यावसायिकाच्या घरातून तब्बल 800 ग्रॅम सोन्याची चोरी; हिरेजडित दागिन्यांसह रोकडही लंपास (संग्रहित फोटो)
नागपूर : अज्ञात आरोपीने एका व्यावसायिकाचे घर फोडून 802 ग्रॅम सोने, हिरा-प्लॅटिनमचे दागिने व रोख 1 लाख रुपयांसह एकूण 47.10 लाखांच्या मुद्देमालावर डल्ला मारला. विशेष म्हणजे दागिन्यांची आवश्यकता असल्याने कपाट उघडले असता ही बाब उघडकीस आली. गणेशपेठ पोलिस ठाण्यांतर्गत बजेरियाच्या मारवाडी चाळ परिसरातीस या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सनी सतीशकुमार गुप्ता (वय 39, रा. लक्ष्मी निवास) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे.
सनी कुमार हे आर्किटेक्ट असून, बहुमजली इमारतीत तिसऱ्या माळ्यावर ते आई राधा, वडील सतीशकुमार आणि पत्नी निकितासोबत राहतात. तळ माळ्यावर सनी यांचे गोदरेज फर्निचरचे दुकान आहे. 10 मे रोजी सनी पुणे येथे बहिणीकडे गेले होते. दुसऱ्या दिवशी आई-वडीलही पुण्याला गेले. केवळ पत्नी निकिता घरी होती. 14 मेच्या सकाळी सनी घरी परतले. 23 मे रोजी त्यांची पत्नी घराला कुलूप लावून इंदौरसाठी रवाना झाली. जाण्यापूर्वी तिने घराची चावी दुकानात ठेवली होती. त्यावेळी सर्व दागिने कपाटातच होते. तेव्हापासून सनी घरी एकटेच होते.
हेदेखील वाचा : Solapur Crime News : प्रेमातून विवाह, पण शेवट दुर्दैवी;…; सोलापुरात आणखी एका ‘वैष्णवी’ने संपवलं आयुष्य
दरम्यान, सनीचे आई-वडील 30 मे रोजी नागपूरला परतले. रविवारी सायंकाळी आईने बेडरूममधील कपाट उघडले असता दागिन्यांचा डबा गायब होता. कपाटातील एक लाखाची रोकडही गायब होती. सनी यांनी त्यांच्या बेडरूममधील कपाट उघडले असता दोन्ही डबे तेथेच होते. मात्र, त्यातील दागिने चोरी झाले होते.
ठसे तज्ज्ञांनाही केले पाचारण
गणेशेपठ पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. ठसे तज्ज्ञांनी बोटांचे ठसे घेतले. प्राथमिक तपासानंतर गणेशपेठ पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा नोंदविला.
ओळखीतीलच कोणीतरी केली चोरी
घर आणि दागिन्यांची पूर्ण माहिती असणाऱ्यापैकीच काणीतरी ही चोरी केल्याचा संशय पोलिसांना आहे. कपाटाच्या चाव्या घरीच होत्या. सर्व कपाटांचे लॉकही लागले होते. पोलिस कुटुंबीयांशी संबंधित सर्वांची चौकशी करीत आहेत.